भोर : पुनर्वसन प्रस्तावित कोंढरी, धानवली गावांची पाहणी

भोर : पुनर्वसन प्रस्तावित कोंढरी, धानवली गावांची पाहणी

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील पुनर्वसन प्रस्तावित असलेल्या कोंढरी, धानवली गावांची पाहणी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील यांनी केली. तालुक्यातील कोंढरी व धानवली या गावांमध्ये 2019 मध्ये भूस्खलन झाले होते. घटनेला 4 वर्षे होऊन पावसाळी हंगामात अतिवृष्टी परिस्थितीमध्ये भूस्खलन होऊन या गावांमधील काही घरांना व वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.

कोंढरी, धानवली या गावांचे पुनर्वसन करण्याचे प्रस्ताव अजून, मंत्रालयातील लालफितीत अडकले असल्यामुळे मंजुरीअभावी रखडले आहेत. यंदा अतिवृष्टीचा धोका तेथील ग्रामस्थांना होऊ नये, यासाठी भोर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून 2023 च्या पावसाळ्यापूर्वी भागाची आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. दोन्ही गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी समजावून घेतल्या. उपाययोजनांबात आढावा घेण्यात आला.

येणार्‍या पावसात लागणार्‍या गरजा लक्षात घेऊन त्यांना रेशनिंग धान्य, आरोग्य सुविधा, शासकीय व शैक्षणिक दाखले हे प्रशासनामार्फत गावातच देणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले. तसेच पाऊसकाळात सतर्क व प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोंढरी ग्रामस्थांना भूस्खलन झाल्यापासून गेल्या चारही वर्षांत गावातून तात्पुरते स्थलांतर व्हावे लागत आहे. परंतु, येथील कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न मात्र आजही कायम असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, याही वर्षी प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले. पुढील पावसाच्या आत आमचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

या वेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, तालुका आरोग्याधिकारी सूर्यकांत कर्‍हाळे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता संजय वागज, पं. स. अभियंता बांधकाम विभाग प्रभाकर पाटील, मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, तलाठी विकास कराळे, ग्रामसेवक सुहास गायकवाड, अनिल अभंग, वैद्यकीय अधिकारी अर्चना
दरेकर, पोलिस हवालदार उद्धव गायकवाड, दत्तात्रय खेंगरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news