वाजपेयींच्या काळात संघाची गरज लागायची… आता भाजप सक्षम; जे. पी. नड्डा यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

J. P. Nadda
J. P. Nadda

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रास्वसं) वैचारिक मार्गदर्शनाची गरज लागत होती. काळाच्या ओघात भाजप पक्ष मोठा झाला आहे. पक्षाचा विस्तार झाल्याने आता सक्षमपणे कार्य करण्यास सिद्ध झाला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे

  • संघ एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर भाजप एक पक्ष आहे. 
  • भाजपचा आता स्वतंत्रपणे कार्य करण्यास भाजप सक्षम झाला आहे. 
  • संघाचे काम वैचारिक आहे, तर भाजपचे काम राजकीय असल्याने आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आपल्या परीने सक्षमपणे पार पाडत आहोत.
  • मथुरा आणि वाराणसीत मंदिर बांधण्याची भाजपची कोणतीही योजना नाही. 

भाजपच्या विश्वासावरच कारभार

एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान त्यांना संघाच्या पाठिंब्याची भाजपला गरज भासते का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नड्डा म्हणाले की, संघाची स्थापना १९२५ साली झाली. संघाच्या वैचारिक मार्गदर्शनाची गरज याआधी भाजपला लागत होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात संघाकडून मार्गदर्शन घेतले जायचे. त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता. भाजपच्या उभारणीमध्ये संघाचा वाटा मोलाचा आहे. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपचा कोणताही मोठा नेता संघाचा प्रचारक अथवा पदाधिकारी नाही. आता स्वतंत्रपणे कार्य करण्यास भाजप सक्षम झाला आहे. पक्ष मोठा झाल्याने भाजपच्या विश्वासावरच कारभार सुरू आहे. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, असे नड्डा यांनी सांगितले.

मथुरा, वाराणसीमध्ये मंदिर बांधण्याची योजना नाही

मथुरा आणि वाराणसीत मंदिर बांधण्याची भाजपची कोणतीही योजना नसल्याचे नड्डा यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपच्या अजेंड्यावर असा कोणताही विषय अथवा चर्चाही नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news