प्रगतीचे गुण पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा; भूगोलाचा पेपर देण्यापूर्वीच झाला होता मृत्यू

प्रगतीचे गुण पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा; भूगोलाचा पेपर देण्यापूर्वीच झाला होता मृत्यू

लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयात शिकणारी व दहावीची परीक्षा दिलेली प्रगती गोरडे हिचा ऐन परीक्षा काळात मृत्यू झाला होता. दहावीच्या निकालात तिने 76 टक्के गुण मिळविले असून, तिचे गुण पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. भूगोलाचा पेपर बाकी असतानाच प्रगतीचा मृत्यू झाला होता. शाळेच्या शंभर टक्के निकालाविषयी शिक्षकांना साशंकता होती.

शुक्रवारी (दि. 2) ऑनलाइन निकाल जाहीर होताच शिक्षकांनी प्रगतीचे गुणपत्रक पाहिले तेव्हा ती उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. इतिहासासह सामाजिक शास्त्रात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे व शिक्षक जड पावलांनी फलकेवाडी येथे किसन गोरडे यांच्या घरी गेले. त्यांनी तुमची प्रगती उत्तीर्ण झाल्याचे सांगताच अवघ्या कुटुंबीयांच्या दुःखाचा बांध फुटला. प्रगतीची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. आई-वडील शेतमजूर असून, त्यांना आणखी दोन मुली आहेत.

प्रगतीवर त्यांची मोठी आशा होती. तिला शिकवून मोठी करण्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. दहावीचे सर्व पेपर तिला चांगले गेले. शेवटचा भूगोल विषयाचा पेपर बाकी असताना परीक्षेचा ताण हलका झाल्याने ती मैत्रिणीसह घरी झोका खेळत होती. झोका खेळताना झोक्याला बांधलेल्या साडीचा फास बसला आणि त्यातच प्रगतीचा मृत्यू झाला. हे सांगताना तिच्या कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाहीत. प्रगती ही विद्यालयातील अत्यंत गुणी, सालस व मनमिळाऊ मुलगी होती, असे सांगताना प्राचार्य अनिल शिंदे हेसुद्धा नि:शब्द झाले होते.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news