बीड: नेकनूर बाजारातून लाखोचा महसूल: मात्र, पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण | पुढारी

बीड: नेकनूर बाजारातून लाखोचा महसूल: मात्र, पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

मनोज गव्हाणे, नेकनूर:

मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या नेकनूरच्या जनावरांच्या आठवडी बाजारातून ग्रामपंचायतीला लाखाच्या घरात महसूल मिळतो. मात्र, तरीही असुविधाचा बाजार कायम आहे. रविवारी तर जनावरांसाठी हौदात पाणीच नसल्याने शेतकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागले. पेरणी तोंडावर आल्याने सध्या जनावरांचा बाजार हाउसफुल असून शेतकऱ्यांना मात्र विविध समस्यांना येथे तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, हौदात पाणी सोडण्यासाठी टँकरची सोय करीत असल्याचे प्रशासकाने ‘दैनिक पुढारी’शी बोलताना सांगितले.

जनावरे दाखल पावती, शेळी चिठ्ठी, भाजीपाला, कोंबडी बाजार, पालातील दुकाने, धक्का असा विविध करातून लाखाच्या घरात महसूल नेकनूर ग्रामपंचायतीला मिळतो. यातून किमान मूलभूत सुविधा तरी निर्माण होणे अपेक्षित असताना स्वच्छतेपासून ते पाण्यापर्यंत बाजारकरूंना समस्य़ा भेडसावत आहे. जनावरांसाठी बांधलेल्या दोन हौदात शनिवारी पाणी भरले जाते. मात्र, या ठिकाणी पाणी नसल्याने विक्रीसाठी आलेल्या बैल, गाय म्हैस, शेळ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे.

बाजार वाढल्याने सध्या शासकीय दवाखान्यापर्यंत शेतकऱ्यांना बैलांच्या दावणी बांधाव्या लागत असून या ठिकाणी गावातील कचरा आणून टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने केल्याने बाजारकरूंचा श्वास गुदमरला आहे. लाखोचा निधी, महसूल येत असताना पाण्यापासून ते स्वच्छतागृह कसलीच सुविधा नेकनूरच्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रशासक तांदळे यांची धडपड

‘दैनिक पुढारी’ने याबाबत प्रशासक तांदळे यांना बाजारात पाणी नसल्याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी लागलीच टँकरद्वारे बाजारातील हौदात पाणी सोडण्यासाठी कर्मचारी कामाला लावले आहेत. त्यामुळे दुपारनंतर जनावरांना पाणी उपलब्ध होईल, असे सांगितले. उन्हाळ्यामुळे गावातील बोअरवेलचे पाणी आटले आहे. यातील काही बोअरवेल दुरुस्तीने चालू राहिले. मात्र, वाढत्या लोकसंख्येला या बोरवेलचे पाणी पुरत नाही. पंधरा दिवसांपासून भंडारवाडीतून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासक पांडुरंग तांदळे यांनी सांगितले.

Back to top button