आळंदी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढा : मुख्याधिकार्‍यांचे आदेश | पुढारी

आळंदी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढा : मुख्याधिकार्‍यांचे आदेश

आळंदी : पुढारी वृत्तसेवा: मुंबई-घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा विचारत घेता आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनीदेखील आळंदी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढण्याचे व याकामी येणारा खर्च होर्डिंग्ज उभारणारे, तसेच ज्यांच्या खासगी जागेत होर्डिंग्ज असतील त्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करातून वसूल करण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागास मंगळवारी (दि. 14) दिले आहेत. या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने नोटीस बजावून पुढील कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिली आहे.

आळंदी नगरपरिषद कार्यालयामार्फत परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या होर्डिंगधारकांनाही नोटीस बजावून 15 दिवसांच्या आत रचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवाल सादर करण्याच्या व असा अहवाल विहित मुदतीत सादर न करणार्‍या होर्डिंग्ज तत्काळ काढण्याबाबत मुख्याधिकारी केंद्रे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागास सूचना केल्या आहेत. नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर येथील 3 व चाकण चौक येथील 1 अशा एकूण 4 होर्डिंग्जदेखील काढून घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी केल्या आहेत.
अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण करणार्‍यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

तसेच, अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंतच्या काळात एखादे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंगधारक, तसेच ज्यांच्या जागेत होर्डिंग्ज असतील त्या जागामालकांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देखील मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिला आहे.

हेही वाचा

Back to top button