Kyrgyzstan Violence : आम्‍ही सर्वजण सुरक्षित, बीडच्या इन्सिया हुसेनचा पुढारीशी संवाद

File photo
File photo

बीड : उदय नागरगोजे हिंसाचाराची जी घटना घडली ती आमच्या ओश शहरापासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे. तरी देखील भारतीय दूतावासाने कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला आहे. यानंतर आता या ठिकाणचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आम्ही बीड जिल्ह्यातील सात जण असून महाराष्ट्रातील जवळपास अडीचशे जण या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती बीड येथील इन्सिया आमेर हुसेन हिने दिली.

बीड जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किर्गिझस्तान मधील विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतात. बीड येथील इंसिया हुसेन ही सध्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ती ज्या ओश् शहरातील महाविद्यालयात शिकते तेथून पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किर्गिझस्तानची राजधानी बिसकेक येथे विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारहाणीची घटना घडली होती. यानंतर तिच्या पालकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता.

त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनीही अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली होती. याची दखल घेत भारतीय दुतावासाने त्या ठिकाणच्या प्रशासनामार्फत सर्व कॉलेजच्या व्यवस्थापनाला संपर्क साधला असून आता अशा कॉलेजमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच होस्टेलमध्ये देखील नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या बाहेर जाऊ नका असे कळवण्यात आले आहे. आम्ही सर्व विद्यार्थी येथे सुरक्षित असल्याचे देखील इन्सियाने सांगितले.

अधिष्ठाता व कॉलेज स्टाफने दिला धीर

किर्गिझस्तान मध्ये बिस्केक येथे झालेल्या घटनेनंतर ओश मधील या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच इतर कर्मचाऱ्यांनी देखील या विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच आम्ही तुमच्या सोबत आहोत कसलीही काळजी करू नका असे देखील सांगितले आहे.

परीक्षा घेतली ऑनलाईन

एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाची वार्षिक परीक्षा सध्या सुरू आहे. नेमके याच काळात या भागात काही ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली आहे. महाविद्यालयाने काळजी म्हणून या विद्यार्थ्यांना होस्टेलच्या बाहेर जाण्यास परवानगी दिलेली नाही. अशा स्थितीत त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा पाठपुरावा

बीड जिल्ह्यातील सात विद्यार्थी किर्गिझस्तान मधील ओश शहरात वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या बीड मधील पालकांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेची संपर्क साधून या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आता या विद्यार्थ्यांच्या कॉलेजने दखल घेतली असून, हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे देखील सांगितले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news