अमेरिकेत पाण्याच्या पाईपमध्ये दिसली चक्क मगर! | पुढारी

अमेरिकेत पाण्याच्या पाईपमध्ये दिसली चक्क मगर!

वॉशिंग्टन : साप, मगर असे प्राणी कुठे जातील हे काही सांगता येत नाही. आता अमेरिकेत फ्लोरिडामध्ये जमिनीखाली असलेल्या पाणीपुरवठ्याच्या लोखंडी पाईपमध्ये चक्क एक मगर वावरत असल्याचे रोबोटिक कॅमेर्‍यात दिसून आले आहे. या पाईपची तपासणी करण्यासाठी हा कॅमेरा पाठवण्यात आला होता. त्यावेळी ही मगर कॅमेर्‍यात टिपली गेली. कॅमेरा जवळ येत असल्याचे पाहून ही मगर मागे वळून धावू लागली व तिच्यामागे हा कॅमेरा धावू लागला!

या पाईपला अनेक ठिकाणी छिद्रे पडत असल्याने त्याचे कारण तपासण्यासाठी हा रोबोटिक कॅमेरा पाईपमध्ये सोडला होता. फ्लोरिडाच्या ओव्हीडो शहरातील ही पाण्याची पाईप आहे. त्यामध्ये या कॅमेर्‍याने चक्क 5 फूट लांबीची मगर असल्याचे दाखवून दिले. शहराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की आधी आम्हाला वाटले या पाईपमध्ये मोठा टोड असावा; पण तिथे इतकी मोठी मगर वावरत असल्याचे पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. आधी कॅमेर्‍यात या मगरीचे दोन चमकदार डोळे दिसले. मगरीने वळून धावण्यास सुरुवात केल्यावर तिचे संपूर्ण शरीर दिसून आले. लोकांनी अशा पाईपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा आता देण्यात आला आहे.

Back to top button