नाशिक : जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारींची राज्याच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत चौकशीसाठी नियुक्त झालेल्या समितीने शुक्रवारी (दि. १९) जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करत जबाब नोंदवले. यात तुम्ही कोणाच्या दबाबाखाली आहात का, तुमच्याकडे कोणी पैशांची मागणी करतात का, काहीही त्रास आहे का अशी विचारणा समितीने केल्याचे बोलले जात आहे. यावेळी समितीने समुदाय अधिकाऱ्यांकडून लेखी घेतले आहे.
दरम्यान, नाशिक येथे दाखल झालेल्या या समितीने त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्षात जात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी केली. काहींशी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहे.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते अनुदान उपलब्धतेनुसार नियमितपणे अदा करण्यात आलेले आहे. कामावर आधारित मोबदला अदा करताना विविध आरोग्य निर्देशकांमधील त्यांची कामगिरी विचारात घेऊन कमी काम असणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर कामावर आधारित मोबदला कपात करण्यात येतो. यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. याबाबतचे सबळ पुरावे असून ते शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
डाॅ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परीषद, नाशिक
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी हे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनाबाबत भ्रष्टाचार करत असल्याबाबतच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यस्तरावरून चौकशी समिती गठीत केली. या समितीने शुक्रवारी सुरगाणा, कळवण, मालेगाव, नांदगाव, येवला, सटाणा, देवळा या तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे जाबजबाब नोंदवले. त्र्यंबकेश्वर येथील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार केलेली असल्याने समितीने त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत प्रत्यक्ष भेट देत अधिकाऱ्यांची चौकशी केली.