पुणे : सांगवी, पिंपळे गुरव विसर्जन घाट परिसरात अस्वच्छता | पुढारी

पुणे : सांगवी, पिंपळे गुरव विसर्जन घाट परिसरात अस्वच्छता

नवी सांगवी : जुनी सांगवी येथील वेताळ महाराज गणपती विसर्जन घाट तसेच पिंपळे गुरव येथील विसर्जन घाटावर गेले काही दिवस अस्वच्छता दिसून येत आहे. येथील पवना नदीपात्रात अक्षरशः कचरा टाकल्याने गाळ निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.  सांगवी, पिंपळे गुरव येथील पवना नदीत रासायनिक केमिकल युक्त पाणी सोडल्याने नदी आधीच प्रदूषित झाली आहे. नदीतील पाण्याचा अक्षरशः रंगच बदलला आहे. संबंधित प्रशासन तर डोळे झाक करीत आहे. मात्र महापालिकेचे आरोग्य विभागही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

आधीच रासायनिक केमिकल नदीत मिसळत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यात अस्वच्छतेची भर पडत असल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीची येथील परिसरात पसरत आहे. येथील पवना नदी किनारी मोठं मोठ्या इमारती, सोसायट्या, बैठी घरे याठिकाणी नागरिक वास्तव्य करीत आहेत तर छोटे मोठे व्यवसायिक, शाळा, कॉलेज, दशक्रिया विधी घाट स्मशानभूमी आदी असल्याने नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. सांगवी पिंपळे गुरव येथील विसर्जन घाट परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरत आहेच. मात्र दिवसेंदिवस अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. परिसरातील नागरिकांचे यामुळे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे.

सांगवी येथील गणपती विसर्जन घाट परिसरात नदी पात्रा लगत पायर्‍यांना लागून मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे, गवत वाढले आहे. त्यावर प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या कपडे, निर्माल्य आदी कचरा साचून अस्वच्छता झाली आहे. नदीतील पाण्याचा बेरंग तर झालाच आहे. घाटावरील हौदात निर्माल्य कचरा साचला आहे. घाटाच्या उजव्या डाव्या बाजूला कदेखील कचर्‍याचे ढिगारेच्या ढिगारे साचलेले पहावयास मिळते. खडी, मातीचे ढिगारे देखील घाटावर आढळून येत आहेत.

पिंपळे गुरव येथील गणपती विसर्जन घाटावर सुरवातीलाच उजव्या बाजूला निर्माल्य, कचरा पाला पाचोळा साचलेला आहे. नदी पात्रालगत पायर्‍यांना लागून अक्षरशः गाळ साचला आहे. पायर्‍यांवर गवत वाढले आहे.  पायर्‍यांवर तसेच हौदात प्लास्टिक कचरा, बाटल्या, कपडे, निर्माल्य आदी स्वच्छता न केल्याने अस्वच्छता दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील परिसरातील स्वच्छता करून नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Back to top button