पुणे : मुळा-मुठा प्रकल्प मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणार | पुढारी

पुणे : मुळा-मुठा प्रकल्प मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वादात अडकलेल्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणेकरांसाठी फायद्याचा अन् महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो मार्च 2025 पर्यंत पूर्ण करू, अशी घोषणा केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी धारा 2023 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनात केली. शेखावत म्हणाले की, नद्या जोडण्याचे काम सुरू असून, पुण्यातील मुळा-मुठा नदीचे पुनरुज्जीवन हे 52 शहरांतून आणलेल्या पाण्याचे कृत्रिम संगम करून नदीजोड प्रकल्पाचा उपक्रम सुरू असल्याचे सांगत देशभरातील प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले की, या नदीसाठी लागणार्‍या अकरा सांडपाणी प्रकल्पासाठी जी जागा लागणार आहे, त्याचा प्रश्न सुटलेला आहे.

या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घातल्याने मी त्यांचे धन्यवाद मानतो. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (एनआययूए) यांनी संयुक्तपणे येत्या 13 व 14 फेब्रुवारीदरम्यान पुणे येथे ’धारा’ अर्थात शहरी नद्यांसाठी समग्र कृतीविषयक उपक्रमांतर्गत ’रिव्हर सिटीज अलायन्स’ म्हणजेच नद्या असणार्‍या शहरांच्या संघटनेच्या सदस्यांची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती. सोमवारी (दि. 13) झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

धारा 2023 च्या माध्यमातून स्थानिक जल संस्थांचे व्यवस्थापन आणि त्यासंबंधीचे उपाय जाणून घेण्यासह विचारमंथन करण्यासाठी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व भारतातील 95 सदस्यीय नदी शहरांचे ज्येष्ठ नियोजक तसेच मुख्य अभियंता यांची उपस्थिती होती. भारताच्या जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर शहरी-20 (यू-20) संकल्पनेंतर्गत उपक्रमाशी या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण समन्वय आहे. शहरी जलसुरक्षा हे यू-20 च्या अनेक उपक्रमांपैकी एक प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरातील एकूण जल सुरक्षा वाढविण्यात निरोगी नद्यांचा मोठा वाटा असल्याने या परिषदेचे महत्त्व आहे.

परिषदेच्या ठिकाणी मुळा-मुठा नदीचे पुनरुज्जीवनची माहिती देण्यासाठी पुणेरी स्टॉल, लोगो व पुणेरी काकाच्या मेस्कॉटने लक्ष वेधून घेतले. परिषदेच्या प्रवेशद्वारावर स्टॉल होते, त्यात मुळा-मुठा नदी पुनरज्जीवन प्रकल्पाचे नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे, पूर येण्याचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागा निर्माण करणे, पात्रात पाणी टिकवून ठेवणे, नदीकडील रस्ता सुधारणे, ऐतिहासिक वास्तू, उद्याने आणि अस्तित्वात असलेल्या जागांचे एकीकरण करणे, या प्रमुख उद्दिष्ट असलेली माहिती देण्यात आली होती. शिवाय, मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे, पर्यावरण संवर्धनासाठी हा प्रकल्प किती महत्त्वपूर्ण आहे, नागरिकांना हा प्रकल्प कसा फायदेशीर ठरणार आहे, याबाबतची माहिती पुणेरी स्टॉलवर होती.

मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन…
मुळा-मुठा नदी पुनज्जीवन प्रकल्प माहिती पुणेकरांपर्यंत पोहचविण्यासाठी पालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पुणे-रे चित्रकला स्पर्धा घेतली होती. स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला. एका मुलीने चित्राला ‘मुळा-मुठा आपली आई… त्यांना जपणे आपले काम’ अशा ओळी लिहीत चित्र रेखाटले. त्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Back to top button