सांगली : राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी बालगाव येथील शिक्षकाविरुद्ध गुन्हा | पुढारी

सांगली : राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी बालगाव येथील शिक्षकाविरुद्ध गुन्हा

जत; पुढारी वृत्तसेवा : बालगाव (ता.जत) येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद कन्नड शाळेतील शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची उमदी पोलिसात फिर्याद संजयकुमार विठ्ठल माळी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कार्यक्रम गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुमारास सुरू होता. सदरच्या ठिकाणचा राष्ट्रध्वज हा वरती केसरी रंगाच्या ऐवजी हिरवा रंग अशी बांधणी शिक्षक प्रभाकर सलगर यांनी केली होती. याबाबत सलगर यांना माहिती असणं गरजेचे होते. दरम्यान, सदर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी (रा. बालगाव) हे पुढे गेले. त्यावेळी राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परिषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांनी दुंडाप्पा कोटी यांना झेंडा फडकविण्याची दोरी हातात दिली तसेच दुसरी दोरी सलगर यांनी स्वत:च्या हातात धरून उभारले. यानंतर राष्ट्रध्वज सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रध्वजाचा केसरी रंग हा वर असणे गरजेचे असताना तो खाली व हिरवा रंग वर अशा स्थितीत सदरचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवहेलना झाली.

तरी सदरचा राष्ट्रध्वज बांधणारे प्रभाकर इरगोंडा सलगर (रा. बालगाव ) हे जिल्हा परिषद शिक्षक असुन त्यांना राष्ट्रध्वज फडकविण्या विषयीचे ज्ञान असताना देखील त्यांनी सदरचा राष्ट्रध्वज उलटा असतानाही तो गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी (रा. बालगाव) यांचे हस्ते फडकविण्यात आला. राष्ट्रध्वजाच्या अपमान झाल्याने सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Back to top button