महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही : खा. सुप्रिया सुळे

बारामती, पुढारी वृत्तसेवा: काही वृत्त वाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये सध्या निवडणूका लागल्या तर भाजपला धक्का बसेल असे भाकित वर्तवले आहे. महाराष्ट्राला गद्दारी आवडत नसल्यानेच हा कल आला असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

बारामतीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, गेली काही महिने ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात, टीव्हीवर महाराष्ट्राची बदनामी झाली, खोक्यांची चर्चा झाली. त्याने राज्याचे प्रचंड राजकीय व सामाजिक नुकसान झाले. त्यामुळेच लोकांच्या मनात रोष निर्माण झाला असल्याने भाजपला धक्का बसेल असे निष्कर्ष आले असतील. मी या सर्व्हेचे स्वागत करते. बेरोजगारी, महागाईने जनता भरडली जात आहे. त्यामुळे भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे.

चित्रपट बाॅयकाॅट करण्याच्या ट्रेंडविषयी त्या म्हणाल्या, कोणी कोणता सिनेमा बघावा हे सरकार सांगणार असेल तर अवघड आहे. हे दडपशाहीचे सरकार आहे. संविधानाने भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिले आहे. जर संविधानाविरोधात कोणी काही करत असेल तर भारतीय जनता ते सहन करणार नाही.

राज्यात घडलेल्या ऑनर किलिंग प्रकाराबाबत दुःख व्यक्त करत त्या म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टी घडतात हे दुदैव आहे. सत्तेतील लोकांनी यात लक्ष घालावे. सत्तेतील लोक द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याने हे प्रकार घडत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपचेच आहेत असे वक्तव्य केले होते. याविषयी त्यांना विचारणा केली असता जयंत पाटील व संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, असे त्या म्हणाल्या. जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्या म्हणाल्या, पाटील यांनी यासंबंधी सर्व गोष्टींचे निरसण केले आहे.

पारगावच्या प्रकरणाची चौकशी व्हावी

पारगाव येथे भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील सातजणांचे मृतदेह आढळले होते. सामुहीक हत्येच्या या प्रकाराबाबत त्या म्हणाल्या, तिघांचे मृतदेह पुन्हा बाहेर काढत शवविच्छेदन केले जाणार आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी मी पालकमंत्री व जिल्हा पोलिस अधिक्षकांना करणार आहे.

Back to top button