गोंदिया: अर्जुनी-मोरगाव येथे मतिमंद तरुणीवर अत्याचार; आरोपीला १४ वर्षे सश्रम कारावास | पुढारी

गोंदिया: अर्जुनी-मोरगाव येथे मतिमंद तरुणीवर अत्याचार; आरोपीला १४ वर्षे सश्रम कारावास

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : एका २४ वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी   १४ वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. निरंजन पुरुषोत्तम चवरे (वय ४१, अर्जुनी-मोरगाव, जि. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित युवती ही मतिमंद असून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.
घटनेच्या दिवशी १० जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती घरी एकटी असताना आरोपीने एकांतवास पाहून तिला स्नानगृहात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिने आरडा ओरड केल्याने शेजारील महिलेने आरोपीला हटकले असता आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला.
दरम्यान, त्या महिलेने घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला दिली. यावर पीडितेच्या आईने १० जानेवारीरोजी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम ३७६ (२) (जे) (एल), ४५० भादंवि अंतर्गत गुन्हा नोंद करून तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे यांनी सविस्तर तपास करून आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
या प्रकरणी दोष सिध्द करण्यासाठी सरकार व पीडित पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वसंतकुमार चुटे यांनी सहाय्यक सरकारी वकील कृष्णा पारधी यांच्या सहकार्याने एकूण ७ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली. एकंदरीत, आरोपीचे वकील व सरकारी पक्षाचे वकील कृष्णा पारधी यांच्या युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश एन.टी. वानखेडे यांनी आरोपी विरूद्ध सरकारी पुरावा ग्राह्य धरून आरोपीला १० सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास तसेच ४ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी १४ वर्षांचा सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार कृष्णकुमार अंबुले यांनी काम पाहिले.
हेही वाचा 

Back to top button