आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे 190 आमदार, तर 36 खासदार निवडून येतील, खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे 190 आमदार, तर 36 खासदार निवडून येतील, खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा

बारामती, पुढारी वृत्तसेवा: आज जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, असे एका सर्व्हेत स्पष्ट झाले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामतीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे घरकुलाची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, महिला तालुकाध्यक्षा वनिता बनकर, शहराध्यक्षा अनिता गायकवाड, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, स्थानिक माजी नगरसेवक बिरजू मांढरे, यांच्यासह आदी या वेळी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, पुण्यासारख्या ठिकाणी सध्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयता आणि गॅंग हे माहीत आहे. पण 'कोयता गॅंग' हा शब्द काय आपल्याला माहीत नाही. महिला रस्त्यात थांबून मला सांगतात की,आमच्या मुली शाळा, कॉलेजला जातात. आम्हाला काळजी वाटते. तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घ्या, यावर चर्चा करा. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे. गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामाला फारसे यश आलेले दिसत नाही. कारण महाराष्ट्र शासनाचा अहवाल असे सांगतो की, गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. ही अतिशय गंभीर आहे बाब आहे, असेही खा. सुळे या वेळी म्हणाल्या.

अनेकजण असे आरोप करतात, की सर्व निधी बारामतीला नेला जातो. यावर खा. सुळे म्हणाल्या की, बारामतीला तर निधी दिलाच आहे. तो बारामतीकरांचा अधिकार आहे. मात्र, इतर तालुक्यांना उपाशी ठेवून बारामतीला निधी दिला हे मला मान्य नाही. इंदापूर, सासवड, जेजुरीचे उदाहरण देत सुळे म्हणाल्या की, जेजुरी मंदिर आणि परिसर विकसित करण्यासाठी ४५० कोटींचा निधी दिला आहे. सासवड शहराला २५० कोटी दिला आहे. सर्वत्र सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news