तान्हाजी मालुसरेंच्या उमरठमध्ये ‘सुभेदार’च्या संहितेचे पूजन | पुढारी

तान्हाजी मालुसरेंच्या उमरठमध्ये 'सुभेदार'च्या संहितेचे पूजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांनी महाराष्ट्रासह देश-विदेशांतील रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर आता ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट तयार होणार आहे. नुकतीच ‘सुभेदार’चे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, शीर्षक भूमिकेतील अजय पूरकर, त्यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी स्मिता शेवाळे, शेलार मामांच्या दमदार भूमिकेतील समीर धर्माधिकारी, चित्रपटाचे निर्माते आदी मंडळींनी सातारा जिल्ह्यातील गोडवली या तान्हाजी मालुसरे यांच्या जन्मगावी भेट दिली.

तिथे मालुसरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रतिमेचे पूजन करून या चित्रपटाचा ‘श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर पोलादपूर तालुक्यातील उमरठ या तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या गावी भेट दिली. तिथे नरवीर तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीचं दर्शन घेतले आणि त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘जय भवानी, जय शिवाजी…’ अशा घोषणांच्या निनादात ‘सुभेदार’ चित्रपटाच्या संहितेचं पूजन करून तान्हाजी आणि शेलारमामा यांच्या चरणी संहिता अर्पण करण्यात आली.

यावेळी दिग्पाल यांनी ‘सुभेदार’ चित्रपटातील ओपनिंग सीनचे वाचन केले. तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमाची महती वर्णन करणारा प्रसंग ऐकतानाच उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्यानंतर उमरठ गावी तान्हाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तिथे ‘सुभेदार’च्या संपूर्ण टिमनं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आपलं मनोगत व्यक्त केलं.

यावेळी दिग्पालनं मालुसरे कुटुंबियांना ‘सुभेदार’ची संहिता दाखवत आपण कशाप्रकारे याचा रिसर्च केला याची विस्तृत माहिती दिली आणि चित्रपटातील संदर्भ, ऐतिहासिक दस्तऐवज आणि दाखले सादर केले. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्य कमिटी, कुणाल मालुसरे (लव्हेरी), रवींद्र तुकाराम मालुसरे (आंबे शिवतर), आबासाहेब मालुसरे (गोडवली), बाळासाहेब मालुसरे (निगडे), संतोषभाऊ मालुसरे (लव्हेरी), मंगेश मालुसरे ( गोडवली ), नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती ऊमरठ, चंद्रकांत दादा कळंबे (अध्यक्ष), अनिलराव मालुसरे, डॉ. शितल मालुसरे, रायबा मालुसरे, ओंकारराजे मालुसरे (पारगड), ८६ गावातील मालुसरे परिवार, १२ मावळ परिवार, इंद्रजीत जेधे, राहुल कंक, अक्षय बांदल, गोरख दादा करंजावणे, गणेश खुटवड पाटील आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी संपूर्ण मालुसरे कुटुंबीयांनी ‘सुभेदार’ चित्रपटाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर करत दिग्पाल आणि त्यांच्या टिमचा उत्साह वाढवला.

Back to top button