नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने | पुढारी

नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले... शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक 9.8 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे यंदाच्या थंडीच्या वातावरणात बदल होऊन सर्वाेच्च निचांकी तापमानाची नोंद ओझर येथे झाली आहे. ओझर मध्ये सध्याचे तापमान ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याने आता ‘क्या रखा है, महाबळेश्वर मे मौसम आजमाना है तो आवो ओझर मे’ असे मेसेजस् सोशल मिडीयात व्हायरल होऊ लागले आहेत. तसेच तापमानाचा पारा घसरल्याने शाळा उशीराने भरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ओझर व परिसरात सकाळपासूनच गार वारे वाहण्याच्या बरोबरच तापमानाचा आकडा देखील खाली जात होता. साेमवारी, दि. 21 पहाटे एचएएल येथे पहाटेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रातील सर्वात निचांकी तापमान ५.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांना थंड वाऱ्याने चांगलीच हुडहुडी भरली असुन दिवसा देखील हवेत गारवा निर्माण झाला होता. ओझरमध्ये घसरलेल्या तापमानाचा परिणाम परिसरातील शाळांवर झाला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा वीस मिनिटे उशीरा शाळा भरल्या आहेत. तर जनजीवन देखील सकाळच्या सत्रात विस्कळीत झाले. यंदा पर्जन्यमान देखील लांबल्याने शेतकऱ्यांवर याचा थेट परिणाम होत खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

थंडीचा वाढलेला जोर हा रब्बीतील गहु हरबरा या पिकांसाठी पोषक असला तरी द्राक्षबागांसाठी नुकसानकारक ठरत आहे. द्राक्षांच्या वेल आणि फळवाढीला याचा मोठा फटका बसत आहे. वाढलेल्या थंडीने द्राक्ष बागायतदार आपल्या बागेत शेकोटीने उब देत आहेत.

हेही वाचा :

Back to top button