नाशिककरांना भरली हुडहुडी; शहराचा पारा ९.८ अंशावर | पुढारी

नाशिककरांना भरली हुडहुडी; शहराचा पारा ९.८ अंशावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून शहराच्या पाऱ्यात घसरण झाली आहे. रविवारी (दि.२०) पारा ९.८ अंशापर्यत खाली आला आहे. त्यामूळे आठवड्याभरापासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना हुडहूडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे.

पाकिस्तानामधील चक्रावाताने हिमालयात बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या शीत लहरींचा वेग वाढला आहे. त्यामूळे शहराच्या पाऱ्यात लक्षणीय घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पारा १० अंशाखाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत असल्याने सुट्टीचा दिवस असूनही नाशिककरांनी घरातच बसणे पसंत केले. तसेच थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांचा ऊबदार कपडे परिधान करण्याकडे कल पाहायला मिळताे आहे.

चालूवर्षी नाशिकमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. अनेक तालूक्यात प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्याची नोंद झाली. आॅक्टोबर एन्डपर्यत पावसाने मुक्काम ठोकल्याने यंदा थंडीचा कडाकाही जाणवेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, शहरात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत म्हणावा तसा गारठा पडलेला नव्हता. पण, दोन दिवसांपासून पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामूळे थंडीचा जोर अधिक वाढला आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे शहरवासीय गारठून गेले आहे. दरम्यान, पुढील २४ तास थंडीचा कडाका कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

शेकोट्यांभोवती गर्दी…

थंडीच्या वाढत्या कडाक्यासोबत शहर-परिसरात पहाटे व रात्रीच्या वेळी शेेकोट्या पेटविल्या जात आहेत. या शेेकोट्यांभोवती नागरिक गर्दी करता आहेत. तसेच नागरिकांनी उबदार कपडेही कपाटातून बाहेर काढले आहेत. थंडीचा जोर बघता विशेष करून बच्चेकंपनी आणि ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी नाशिककर घेत आहेत.

पहाटे मैदाने फुल्ल…

पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दवबिंदुमुळे शहर धुक्यात हरवून जात आहे. त्यातच थंड वाऱ्यांचा वेगही अधिक असतो. मात्र, तरीही या वातावरणात नाशिककर फिरण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत. तसेच पहाटे व सायंकाळी शहर-परिसरातील जॉगिंग ट्रॅक व मैदाने नागरिकांच्या गर्दीमुळे फुल्ल होत आहेत.

शहरात १० दिवसांचे किमान तापमान असे..

तारीख       अंश सेल्सियस

११                १३.८

१२                १३.९

१३              १४.३

१४              १५.१

१५              १५.२

१६            १४.४

१७             १३.९

१८             ११.२

१९               १०.४

२०                ९.८

हेही वाचा:

Back to top button