धक्‍कादायक : डॉक्‍टर पतीने चाकूने कापले डॉक्‍टर पत्‍नीचे केस | पुढारी

धक्‍कादायक : डॉक्‍टर पतीने चाकूने कापले डॉक्‍टर पत्‍नीचे केस

पुणे ; पुढारी वृत्तसेवा :  बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे चाकूने केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी डॉक्टर पतीला विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

डॉ. रवी दिगंबर धादवड (रा. तिरूपती रेसीडेन्सी, मुंजोबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे.

याबाबत डॉ. पल्लवी रवी धादवड (37) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी ह्या डॉक्टर असून त्यांचे पती हे देखील डॉक्टर आहेत.

दोन वर्षापासून मुंजाबावस्ती येथील तिरूपती रेसिडेन्सी येथे ते राहतात.

त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. दोघांचा विवाह पाच वर्षापूर्वी झाला आहे. लग्न झाल्यावर काही दिवस सर्व काही ठीक होते.

मात्र यानंतर डॉ. पतीने त्‍यांच्या डॉक्‍टर पत्‍नीला माहेरहून पैसे आणवेत यासाठी मारहाण सुरू केली.

परंतु, पल्लवी यांनी आई वडिलांच्या सामाजिक स्थानामुळे मारहाणीची वाच्चता त्यांच्याजवळ केली नाही.

परंतु, मारहाणीचा प्रकार जास्तच वाढत चालल्यानंतर त्यांनी शेवटी नाशिक येथे माहेरी जाणे पसंत केले.

आई-वडिलांनी पतीला समजावले. मुलीला पुन्हा सासरी पाठविले.

फेब्रुवारी 2021 मध्ये दाेघांमध्‍येही पुन्हा भांडणे झाली. त्यानंतर पल्लवी या पुन्हा माहेरी गेल्या. याच दरम्यान सासर्‍यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला पतीने पल्‍लवीलाच जबाबदार धरले.

नातेवाईकांनी पुन्हा समजुत काढून पल्लवी यांना नांदायला पाठविले. पती सोबत राहत असताना रविवारी (दि. 8) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पल्लवी यांनी त्यांच्या मुलीसोबत जेवण केले. परंतु पती हा दारू पित बसला होता.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रवी हा पल्लवी यांच्या जवळ गेला. त्याने पल्लवी शिवीगाळ करून माझ्‍या वडिलांचा तुझ्‍यामुळेच मृत्‍यू झाल्‍याचा आराेप त्‍याने केला. यावेळी पल्लवी यांनी माझ्या बहिणीचे लग्न आहे, मी लग्नाला जाते म्हणून त्यांनी पतीला विचारणा केली.

यावरून पतीने अधिकच चिडून जात, तु कशी जाते मी पाहतो असे म्हणुन घरात त्याने लपवुन ठेवलेला चाकू काढून त्यांच्या डोक्याचे केस कापले. त्याला पल्लवी यांनी रडून विरोध केल्यानंतर त्याने त्यांच्या पाठीवर, उजव्या दंडावर चाकू मारून त्‍यांना जखमी केले.

मारहाण करताना पतीच्या हातालाही चाकू लागला. पती मेडीकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेला.

यानंतर पल्‍लवी यांनी घराचा दरवाजा बंद करून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लावून पोलिसांना बोलवून घेतले.

पोलिस घरी आल्यानंतर त्यांनी पल्लवी यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. पती डॉ. रवी याला ताब्यात घेतले .

या प्रकरणी पाेलिसांनी डॉ. रवी धादवड याला अटक केली आहे. आज त्‍याला  न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिस ठाण्‍याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिली.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :पुराने उद्ध्वस्त झालेल्या माणसांच्या गोष्टी 

 

 

Back to top button