मुंबई : स्वदेशी उपवासाला चालतो विदेशी साबुदाणा | पुढारी

मुंबई : स्वदेशी उपवासाला चालतो विदेशी साबुदाणा

नवी मुंबई ; राजेंद्र पाटील : उपवासाला काय चालते आणि काय चालत नाही याचे उत्तर कुठल्या धर्मग्रंथात नाही. जे मिळेल त्या उत्तराला कुठले प्रमाण नाही आणि तारतम्य तर नाहीच नाही. त्यामुळेच अस्सल विदेशी साबुदाणा उपवासाला चालणार्‍या पदार्थांमध्ये क्रमांक एकवर असून, एकट्या श्रावण महिन्यात मुंबईकर तब्बल 15 हजार क्विंटल साबुदाणा फस्त करतात.

आपल्याकडे उपवासाला चालणारे बहुतांश पदार्थ विदेशातून आले आणि कायमची जागा पटकावून बसले. बटाटा, मिरची पोर्तुगीजांनी आणली. रताळी मूळ दक्षिण अमेरिकेची. साबुदाणा मूळचा ब्राझीलचा.

नंतर तो दक्षिण अमेरिकेत लोकप्रिय झाला. त्यानंतर स्पॅनिश आणि पोर्तुगीजांनी हा विदेशी साबुदाणा जगभर पसरवला. भारतात आता साबुदाण्याचे वडे, उसळ, थालीपीठ या पदार्थांशिवाय उपवासाचे पान हालत नाही. उपवासाशिवायचे दिवसही आम्हाला साबुदाण्याचे वडे लागतातच लागतात.

भारतात साबुदाण्याचे उत्पादन सर्वप्रथम तामिळनाडूच्या सेलममध्ये झाले. 1943-1944 च्या सुमारास कुटिर उद्योगाच्या स्वरूपात साबुदाणा उत्पादित होऊ लागला. आजही याच सेलममधून भारतभर साबुदाणा पुरवला जातो.

एरवी मुंबईकर दररोज 7500 क्विंटल साबुदाणा पचवितात. मात्र श्रावणात साबुदाण्याचा खप दुप्पट होऊन 15 हजार क्विंटलवर पोहचतोे, अशी माहिती घाऊक साबुदाणा व्यापारी मयुर सोनी यांनी दिली. मुंबईला दररोज 7 ते साडेसात हजार क्विंटल साबुदाणा लागतो. म्हणजे तीन गाडी माल पुरवला जातो.

एका गाडीत 50 किलो वजनाचे 1500 ते 1600 कट्टे असतात. तेवढा साबुदाणा मागणीनुसार किरकोळ बाजारात विक्री होतो. श्रावणात ही मागणी दुप्पट होते. श्रावणात रोज 15 हजार क्विंटल म्हणजे सहा गाडी साबुदाणा मुंबईकरांना पुरवला जातो. एपीएमसीत घाऊक बाजारात साबुदाणा 47 ते 50 रुपये किलो असून किरकोळ बाजारात 78 रुपये किलो आहे.

9 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली. त्यापूर्वी आठवडभरा आधीच किरकोळ व्यापार्‍यांनी साबुदाण्याची घाऊक खरेदी केली. एपीएमसीतील घाऊक व्यापार्‍यांनी तामिळनाडू तेथील सेलममधील मिलमधून साबुदाणाची मागणीनुसार खरेदी केली आहे.

साबुदाणासाठी तामिळनाडूमधील सेलम हे एकमेव ठिकाण आहे. येथे 150 हून अधिक साबुदाणा मिल आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला येथून तयार होणार्‍या साबुदाणापैकी 50 टक्के साबुदाणा पुरवला जातो. तर उर्वरित इतर राज्यांना 50 टक्के माल पुरवठा होतो. महाराष्ट्रात साबुदाण्याला ग्रामीण भागातही मोठी मागणी असल्याचे घाऊक व्यापारी मयूर सोनी यांनी सांगितले.

Back to top button