कचर्‍यापासून टोकियो मध्ये बनलेली वीज वापरणारे हॉटेल | पुढारी

कचर्‍यापासून टोकियो मध्ये बनलेली वीज वापरणारे हॉटेल

टोकियो : जपानची राजधानी टोकियो मध्ये एक असे हॉटेल आहे जिथे पूर्णपणे कचर्‍यापासून बनवलेल्या विजेचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या कचर्‍यापासून निर्माण झालेल्या हायड्रोजनचा यासाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून उपयोग केला जातो. या हॉटेल ‘कावासाकी किंग स्कायफ्रंट टोक्यू रे’मध्ये तीस टक्के हायड्रोजन ऊर्जा प्लास्टिक कचरा आणि अन्य ऊर्जा ‘फूड वेस्ट’ म्हणजेच टाकलेल्या खाद्यपदार्थांपासून बनवली जाते.

कचर्‍यापासून हायड्रोजन ऊर्जा बनवण्याचे तंत्र जपानी कंपनी ‘तोशिबा’ने विकसित केले आहे. हायड्रोजन इंधन सेल सिस्टीम ही कार्बन उत्सर्जनाशिवायच हायड्रोजनला विजेत रुपांतरीत करते. ही प्रणाली संपूर्ण हॉटेलमध्ये पाईपच्या माध्यमातून ऊर्जा पुरवठा करते. तिथे हायड्रोजनचा निश्चित पुरवठा होत राहतो. ही संपूर्ण प्रक्रिया कार्बनमुक्त आणि ईका-फे्रंडली आहे. याठिकाणी लोकांनी दिलेल्या टूथब्रश आणि कंगव्यासारख्या वस्तूंचाही वापर केला जातो. हायड्रोपोनिक्स म्हणजेच मातीशिवायच रोप उगवण्याची प्रक्रिया तसेच एलईडी प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून हॉटेलमधील अंतर्गत भागातील रोपे वाढवली जातात.

टोकियोमधील या हॉटेलच्या लॉबीत कीटकनाशकमुक्त लेट्यूस उगवून ती महिन्यातून एकदा कापली जाते. हे हॉटेल दरवर्षी तीन लाख घन नॅनोमीटर हायड्रोजनची पूर्तता करते. त्यापासून 4 लाख 50 हजार किलोवॅट वीज उत्पन्न होते. इतकी वीज एक वर्षासाठी 82 घरांची विजेची गरज भागवू शकते.

Back to top button