नागपूर पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गीतांजली टाॅकीज चौकात सोमवारी झालेल्या गोळीबार झाला. या गोळीबारात जाफर नगर निवासी मोहसीन भूऱ्या याच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली. त्याला मेयो हास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार करून आरोपी पळून जातानाचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नागपूर येथील कळमना नाका नं. २ निवासी मुश्फिकने त्याचे साथीदार अल्ताफ मिर्झा याला सोबत घेऊन गोळीबार केला. जुन्या भांडणातून हा गोळीबार झाल्याचे समजते आहे.
मोहसीन भुऱ्या ताजबागला गेला असून पहाटे परतणार असल्याची माहिती मुश्फिकला होती. म्हणून तो साथीदारासह गीतांजली टाॅकीज चौकात दबा धरून बसला. मोहसीन चौकात येताच त्याने गोळीबार केला.
त्यात उजव्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. गोळीबारा नंतर आरोपी लागलीच तिथून फरार झाले. लोकांनी मोहसीनला मेयोमध्ये भरती केले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागपूर शहर गोळीबार तसेच अन्य गुन्हांनी हादरले आहे.