वॉशिंग्टन : भविष्यात माणसाला मंगळ ग्रहावर पाठवण्याचे स्वप्न अनेक अंतराळ संस्था आणि खासगी कंपन्याही पाहत आहेत. अर्थातच इतक्या दीर्घ पल्ल्याचा प्रवास करून माणसाला पाठवणे हेच एक आव्हान आहे असे नाही.
मंगळासारख्या कोरड्या ग्रहावर राहणेही मोठेच आव्हान आहे. तिथे कसे राहता येऊ शकेल याची चाचपणी पृथ्वीवरच अनेकवेळा करून पाहिली जात असते. आताही 'नासा'ने चार जणांना वर्षभरासाठी मंगळासारख्या स्थितीत ठेवून पाहण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
मंगळावरील आव्हानांचा सामना करता यावा यासाठी हा प्रयोग करून पाहिला जाणार आहे. त्यासाठी ह्यूस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये 'मंगळ ग्रह'च बनवण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या चार जणांना या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ठेवले जाईल.
तिथे थ्री-डी प्रिंटरच्या सहाय्याने मार्स ड्यून अल्फा बनवण्यात आला आहे. तो 1700 चौरस फूट जागेत पसरलेला आहे. याठिकाणी राहणार्या लोकांच्या शारीरिक व मानसिक आव्हानांचा अभ्यास केला जाईल. या मार्स ड्यून अल्फामध्ये चारही जणांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल.
तिथे सुविधा मर्यादित असतील, एखाद्याशी संवाद साधणे सहजसोपे नसेल तसेच तेथील उपकरणे ऐनवेळी बंद पडण्याचे धोकेही असतील. मंगळग्रहावर गेलेल्या अंतराळवीरांना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात व त्यामधून कसा मार्ग काढला जाऊ शकतो हे यावेळी पाहिले जाणार आहे.
या प्रयोगासाठी इच्छुक अमेरिकन नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 30 ते 35 वर्षे वयोगटातील व धूम्रपान न करणारे चार अमेरिकन लोक यासाठी निवडले जातील. अर्जदार इंग्रजी भाषेत निष्णात आणि शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त असावा अशी अट आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून त्याने इंजिनिअरिंग, गणित, भौतिकशास्त्र किंवा कॉम्प्युटर सायन्समधून मास्टर डीग्री घेतलेली असावी.