न्यूयॉर्क : कोरोना विषाणूची सतत बदलणारी रूपं अवघ्या जगासाठीच चिंतेचा विषय बनलेली आहेत. कोरोनाच्या नव्या नव्या व्हेरिएंटस्वर प्रभावी लस निर्माण करणेही आव्हानात्मक बनलेले आहे. अशावेळी संशोधकांना मानवी शरीरातच एक अशी अँटिबॉडी सापडली आहे जी कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटस्वर प्रभावी ठरू शकेल. अशा अँटिबॉडीचा वापर करून लस विकसित करण्याबाबतही संशोधन सुरू झाले आहे.
अशा प्रकारची लस कोरोनाच्या उपचारात शंभर टक्के परिणामकारक ठरू शकते. ही अँटिबॉडी अशा लोकांच्या शरीरात आढळली आहे जे कोरोनातून बरे झाले आहेत. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्याची माहिती 'सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार संशोधकांनी कोरोनातून बरे झालेल्या लोकांमधील पाच प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडींचा छडा लावला आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटस्शी 'क्रॉस रिअॅक्शन' करून या अँटिबॉडी त्यांना निष्क्रिय बनवू शकतात.
कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटस्ना नष्ट करण्यासाठी या पाच प्रकारच्या अँटिबॉडी प्रभावी असल्याचे पाहून संशोधकांचा हुरूप वाढला आहे. आता या अँटिबॉडीजचा वापर करून नवी प्रभावी लस विकसित करण्याच्या द़ृष्टीने काम सुरू आहे. अशी लस कोरोनावरील उपचारासाठी शंभर टक्के प्रभावी ठरू शकते.