मुंबई : तलावांत अवघा 19 टक्के पाणीसाठा ! | पुढारी

मुंबई : तलावांत अवघा 19 टक्के पाणीसाठा !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांमध्ये अवघा 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा व भातसा तलावही आटत आला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तलावांतील राखीव कोट्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे पाणीकपात करावी लागणार नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामध्ये झालेली वाढ, यामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन व पाण्याचा होणारा सर्वाधिक वापर यामुळे तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावामध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मात्र या तलावांमध्ये सध्या दोन लाख 85 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 2022 च्या तुलनेत तब्बल पाच टक्क्याने म्हणजेच 85 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे. शहराला दररोज सर्वाधिक 1,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे. या तलावात सुमारे 7 लाख 17 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या या तलावात 1 लाख 29 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी तलावातीलही पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. येत्या मे महिन्यात पाणीसाठ्यात 10 ते 12 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत मुंबई महापालिकेला तलावाच्या राखीव कोट्यातील पाणी उचलावे लागणार आहे. राखीव कोट्यामध्ये सुमारे दीड लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असल्यामुळे पाणी कपात करावी लागणार नसल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

तलावातील पाणीसाठाची टक्केवारी (29 एप्रिल)

तलाव पाणीसाठा       (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा          42,140 (18.56%)
मोडक सागर           31,286 (24.27%)
तानसा                    52,043 (35.87%)
मध्य वैतरणा           18,700 (9.66%)
भातसा                   1,29,032 (18%)
विहार                     9,046 (32.66%)
तुळशी                   3,031 (37.67%)

Back to top button