चला प्रचाराला… खाऊन-पिऊन 500 ते 700 रुपये!; 20 मेपर्यंत बुकिंग फुल्ल | पुढारी

चला प्रचाराला... खाऊन-पिऊन 500 ते 700 रुपये!; 20 मेपर्यंत बुकिंग फुल्ल

मुंबई : राजेश सावंत :  बेरोजगारी वाढल्याची ओरड होत असली तरी लोकसभा निवडणूक मात्र बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी देणारी ठरत आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बेरोजगार तरुणांना हंगामी कार्यकर्ते म्हणून प्रचाराच्या कामाला जुंपले असून, दिवसभर प्रचारात फिरण्यासाठी दररोज खाऊन पिऊन 500 ते 700 रुपये मानधन या हंगामी कार्यकर्त्यांना दिले जात आहे. त्यामुळे मुंबईत हंगामी कार्यकर्ते 20 मेपर्यंत बुक झाल्याचे चित्र दिसते.

निवडणुका म्हटल्या की, कार्यकर्त्यांसाठी खाण्यापिण्यासह कमाईची संधी असते. पूर्वी कार्यकर्ते चक्क कामावर सुटी टाकून प्रचारात भाग घेत होते. मात्र, आता चित्र बदलले असून, पक्षासाठी विनामोबदला काम करणारे कार्यकर्ते आता राहिलेले नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांवर पैसे देऊन हंगामी कार्यकर्ते आणण्याची वेळ आली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, सर्वच उमेदवारांना विधानसभा मतदारसंघनिहाय दररोज किमान 400 ते 500 कार्यकर्त्यांची गरज असते. बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात अनेक उमेदवारांनीही हंगामी कार्यकर्ते नेमले असून, त्यांना दररोज खाऊन पिऊन 500 ते 700 रुपये मानधन दिले जात असल्याचे सांगण्यात येते. या हंगामी कार्यकर्त्यांची नियुक्ती आणि त्यांच्या कामाचे नियोजन याची जबाबदारी उमेदवारांनी त्या त्या विभागातील पक्ष पदाधिकार्‍यांकडे सोपवली आहे. त्यानसार, हंगामी कार्यकर्त्यांचे एक मस्टरबुकही तयार करण्यात आले आहे. दररोज सकाळी हजेरी लावूनच प्रत्येक कार्यकर्त्याला प्रचारात सामील होता येते.

प्रशासकीय कामांसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती

प्रचार सभा, जाहीर सभा, पदयात्रा यासाठी लागणार्‍या निवडणूक विभागाच्या परवानग्या घेणे, त्यासाठी लागणारा पत्रव्यवहार करणे व अन्य प्रशासकीय कामांसाठी उमेदवारांनी किमान 20 ते 25 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यासाठी त्यांना दररोज खाऊन पिऊन एक हजार ते 1 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत आहे.

रोजचा 6 ते 7 लाखांचा खर्च!

प्रत्येक उमेदवाराला रोजचा 6 ते 7 लाखांचा खर्च येत आहे. यात हंगामी कार्यकर्त्यांच्या मानधनावर सुमारे 2 लाख 50 हजार ते 3 लाख 50 हजार रुपये खर्च होत आहेत. त्याशिवाय जेवण, नाश्ता, पाणी व अन्य खर्च तीन ते साडेतीन लाखांच्या घरात जातो.

असे आहे नियोजन

विभागात काढण्यात येणार्‍या पदयात्रेत सहभागी होण्यासह घरोघरी जाऊन पत्रक वाटण्यासह अन्य कामे.
सकाळी 8 ते रात्री 8 किंवा सकाळी 10 ते रात्री 10 अशी असते ड्यूटी.
सकाळी हजेरी लावल्यानंतर त्या दिवशी कोणत्या कार्यकर्त्याने काय करायचे, हे सांगण्यात येते.
पक्षाचे निवडणूक कार्यालय रिकामी राहू नये यासाठी कार्यालयातही काही कार्यकर्त्यांची नियुक्ती.
हंगामी कार्यकर्त्यांची ही नियुक्ती 20 मेपर्यंत असेल.

व्हेज-नॉनव्हेजची मेजवानी!

कार्यकर्त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण दिले जाते. यात सकाळी उपमा व पोहे दुपारी शाकाहारी जेवण, सायंकाळी चहा-बिस्कीट, रात्री मांसाहारी जेवण, पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. त्याशिवाय काही कार्यकर्त्यांना वाहन खर्चही दिला जातो.

Back to top button