CSK vs GT : चेन्नईचे गुजरातला १७३ धावांचे आव्हान | पुढारी

CSK vs GT : चेन्नईचे गुजरातला १७३ धावांचे आव्हान

चेन्नई; वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात 7 बाद 172 धावांत रोखले. ऋतुराजच्या 60 धावांच्या जोरावर चेन्नईने दमदार सुरुवात केली होती. मात्र, तो बाद झाल्यावर चेन्नईचा डाव घसरला. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी चांगला मारा करत प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. (CSK vs GT)

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आपल्या संघात एक बदल केला, यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेला संधी दिली. चेन्नई सुपर किंग्जला दर्शन नळकांडेने पहिला धक्का दिला होता. त्याने ऋतुराज गायकवाडला 2 धावांवर बाद केले होते. मात्र, तो चेंडू अम्पायरने नो बॉल दिला अन् ऋतुराजला जीवनदान मिळाले. त्यानंतर ऋतुराजने पुढच्याच चेंडूवर षटकार मारला.

मात्र, गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी सीएसकेच्या सलामीवीरांना हात खोलण्याची फारशी संधी दिली नाही. चेन्नईने 4 षटकांत 31 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, यानंतर ऋतुराज गायकवाडने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने सीएसकेला 7 व्या षटकात 60 धावांचा टप्पा पार करून दिला होता. दुसर्‍या बाजूने डेवॉन कॉन्वे त्याला सावध फलंदाजी करत साथ देत होता. ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेनंतर धावांची गती वाढवत सीएसकेला 10 षटकांत 85 धावांपर्यंत पोहोचवले. 37 चेंडूत ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 44 चेंडूत 60 धावा केल्यानंतर ऋतुराजला मोहित शर्माने बाद करत चेन्नईला 87 धावांवर पहिला धक्का दिला.

ऋतुराज बाद झाल्यानंतर कॉन्वेने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला मोठे फटके मारण्यात अपयश येत होते. शिवम दुबे 1 तर अजिंक्य रहाणे 17 धावा करून माघारी गेले. डेवॉन कॉन्वे देखील 34 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.

यानंतर आलेल्या अंबाती रायडूने 9 चेंडूत 17 धावा चोपल्या खर्‍या; मात्र त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. चेन्नईने आपली दीडशतकी मजल मारली होती. मात्र, शेवटची दोनच षटके राहिली असताना धोनी 1 धाव करून बाद झाला. अखेर रवींद्र जडेजाने 22 धावांचे आणि मोईन अलीने 9 धावांचे योगदान देत चेन्नईला 172 धावांपर्यंत पोहोचवले. मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी चांगला मारा करत प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.

हेही वाचा;

Back to top button