वडील चहाच्या टपरीवर अन् आई विडी वळायची; अहमदनगरच्या मंगेश खिलारीचे डोळे दिपवणारे यश | पुढारी

वडील चहाच्या टपरीवर अन् आई विडी वळायची; अहमदनगरच्या मंगेश खिलारीचे डोळे दिपवणारे यश

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील चहा व वडापावची टपरी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पाराजी बबन खिलारी तसेच विड्या बांधून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या संगीता खिलारी यांचा मुलगा मंगेश पाराजी खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 396 क्रमांक प्राप्त केला आहे.

मंगेश खिलारी यांचे प्राथमिक शिक्षण सुकेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिकचे शिक्षण शुक्लेश्वर विद्यालयात पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले, त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे येथील एसपी कॉलेजमध्ये कला शाखेत पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये पूर्ण केले.

मंगेश यांनी पुण्यात जाऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासाचीसुद्धा तयारी सुरू केली. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आयपीएस अधिकारी व्हायचेच आहे, अशी जिद्द मनाशी ठेवून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. गेली तीन ते चार वर्ष ते या परीक्षेची तयारी करत होते. अखेर मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत मंगेश खिलारी यांनी देशात 396 वा क्रमांक प्राप्त केला असल्याचे स्वतः त्यांनी आपल्या आई-वडिलांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. आपला मुलगा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला, हे वृत्त कुटुंबीयांच्या कानी पडताच सर्वांचा आनंद गगनामध्ये मावेनासा झाला. मंगेश यांना रवींद्र खिलारी आणि बहीण शमिका यांनी अभ्यासासाठी सहाय्य केले. यूपीएससीच्या परीक्षेत 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल संपूर्ण सुकेवाडी गावातून मंगेश खिलारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आई वडील अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुचत नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. आपल्या मुलाने आमच्या दोघांच्या कष्टाचे चीज करत आमच्या कुटुंबाचे, गावाचे आणि तालुक्याचे नाव देशात उज्वल केले असल्याची भावना वडील पाराजी खिलारी आणि आई संगीता खिलारी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

Back to top button