कोल्हापूरमध्ये अग्नितांडव! छ. शिवाजी चौकातील दुकानाला भीषण आग | पुढारी

कोल्हापूरमध्ये अग्नितांडव! छ. शिवाजी चौकातील दुकानाला भीषण आग

पुढारी ऑनलाइन :   शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी रोडवरील व रिकिबदार गल्ली येथील मोमीन बंधूंच्या इलेक्ट्रिक वस्तू, प्लास्टिक आणि कटलरी साहित्य विक्रीच्या चार दुकानांसह गोदामाला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 50 ते 55 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दल, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोमीन कुटुंबीयांतील सहाजण सुदैवाने बचावले. बचाव कार्यात सुपर शॉपीचे भलेमोठे दोन मजली शेड जेसीबीने उद्ध्वस्त करावे लागले.

गोदामांसह दुकाने बेचिराख झाल्याने अकबर मोहल्ल्यातील मोमीन बंधू अक्षरश: उघड्यावर आले आहेत. सायंकाळी सव्वापाच वाजता गोदामाला प्रथमत: आग लागली. प्लास्टिक, कटलरी आणि इलेक्ट्रिक साहित्याने पेट घेतल्याने धुराचे लोट आकाशात झेपावू लागले. वार्‍यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असतानाच त्यांच्याच इतर चार दुकानांसह दुसर्‍या मजल्यावरील गोदामाला आग लागली.

अग्निशमन दलाच्या सात गाड्यांसह चार टँकर तसेच जवान घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा होत असतानाही प्लास्टिक व कटलरी साहित्यामुळे आग आणखी भडकली. दोन्हीही बाजूंकडून आगीने रौद्ररूप धारण केले होते. मनपा अग्निशमन दल, पोलिस यंत्रणेसह परिसरातील सर्वच व्यावसायिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते मदत कार्यात सहभागी झाले.

व्यावसायिक शाहिद मोमीन, मुबित मोमीन, रफिक मोमीन व जुनैद मोमीन यांची विविध वस्तूंच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीची शिवाजी रोडवर दुकानांसह गोदाम आहे. उन्ह्याळ्यामुळे इलेक्ट्रिक वस्तूचा साठा गोदामात करण्यात आला होता. शिवाय कटलरी वस्तूंनी दुकाने भरलेली होती.

चारही दुकानात सकाळपासून सतत ग्राहकांची वर्दळ असते. सायंकाळीला गर्दी असतानाच आग लागली. परिसरातील व्यावसायिकांनी आरडा-ओरड केल्याने ग्राहक तत्काळ दुकानातून बाहेर पडले तर मोमीन कुटुंबियांतील सहा तरूण दुकानात अडकले. मात्र अग्नीशमन दल, पोलिसांनी तरूणांना तातडीने सुखरूपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
दुसर्‍या मजल्यावरील शेड उध्वस्त केले.

आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शिवाजी रोडसह परिसरातील विद्युत पुरवठा तातडीने खंडीत करण्यात आला. पत्र्याच्या बंदिस्त शेडमुळे आग नियंत्रणात येत नव्हती, महापालिका कर्मचार्‍यांना जेसीबी मशिनद्वारे दुसर्‍या मजल्यावरील शेड उध्वस्त करावे लागले. त्यानंतर आगीवर नियंत्रण ठेवण्यात जवानांना यश आले.

महिलांना अश्रु अनावर

मोमीन कुटुंबियांनी मोठ्या कष्टाने व्यावसायिक फर्मचा पसारा वाढविला होता. कुटुंबियांतील महिलांसह सर्वच मंडळींचा राबता होता. दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झाल्याने महिलांना अश्रु अनावर झाल. मोमीन कुटुंबातील सारेच हतबल झाले होते.
मनपा आयुक्तांनी केली घटनास्थळाची पाहणी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कांदबरी बलकवडे यांच्यासह अधिकार्‍यांनी रात्री घटनास्थळाची पाहणी करून अग्नीशमन दल, पोलिस अधिकार्‍यांना सुचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक इश्वर परमार, किरण नकाते, आदिल फरास, रियाज सुभेदार, अरूण चोपदार,रमेश पोवार आदी उपस्थित होते.

वाहतूक रोखली !

खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंजना फाळके, उपनिरीक्षक इकबाल महात, उपनिरीक्षक भगवान गिरीगोसावी, प्रितमकुमार पुजारी, हवालदार संजय कोळी, प्रतिक शिंदे, रोहित मर्दाने, सुहास पाटील, मंगेश माने यांनी परिसराची अक्षरश: नाकाबंदी करून वाहतूक रोखली होती. छ. शिवाजी रोडवर राखेचे ढिगारे चार दुकानांसह गोदामातील सर्व किंमती वस्तू आगीत बेचिराख झाल्याने दुकानासह रस्त्यावर अक्षरश: जळलेल्या वस्तूंचे ढिगारे दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते.

चार तासानंतर आग आटोक्यात

प्लॅस्टिक, कटलरी व इलेक्ट्रिक साहित्यामुळे आगीने भडका उडाला होता. सव्वा पाच वाजता लागलेली आग रात्री साडेनऊला म्हणजेच साडे चार तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. या घटनेनंतर परिसरातील सर्वच व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले होते.
तब्बल 55 लाखाची हानी भीषण दुर्घटनेत किमान 50 ते 55 लाखाचे नुकसान झाले असावे,अशी शक्यता पोलिस व अग्नीशमन दलाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

Back to top button