नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा | पुढारी

नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अतिशय हुशारीने आणि कल्पक व्यूहरचनेतून बीआरएस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदीचा सपाटा सुरू करत घसघशीत बाजारभाव मिळवून दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे येत्या निवडणुकीत वांदे करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

कांद्याला भाव नाही म्हणून अनेकदा शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु याच शेतकऱ्यांच्या मदतीला आता तेलंगणा सरकार धावून आले आहे. लासलगावला कांद्याची समृद्ध बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची पंधराशे रुपये इतक्या चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना खूश करण्याची रणनीती आखली आहे. लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे भाव ठरतात. महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांकडून पंधराशे रुपये दराने बीआरएस हा कांदा खरेदी करत आहे. लासलगाव बाजार समितीत ७००-९०० रुपये कांद्याला भाव मिळत होता. मात्र तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील विस्तारासाठी रणनीती आखली असून, अबकी बार किसान सरकार हा नारा दिला आहे. कांद्याचे भाव आगामी काळात उंचावण्याचे धनुष्य राव यांनी उचलले असून, त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांदादरात आता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हात घातला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव कसा मिळेल यादृष्टीने बीआरएस पक्ष कामाला लागला आहे. राव यांच्या रणनीतीने राज्यातील भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी जे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

शब्द खरा ठरवला

महाराष्ट्रातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते, त्यांना बीआरएस पक्षाने शब्द दिला होता कांदा फेकू नका, आम्ही तो विकत घेऊ. त्यांनी हा शब्द खरा ठरवला. जो कांदा शेतकरी फेकून देत होते, त्याला चढ्या दराने भाव मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button