पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने लोकसभेच्या उत्तर -मध्य मुंबईमधून ॲड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्याविरोधात ते निवडणूक लढवतील.
ॲड. उज्ज्वल निकम यांनी १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली आहे. खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी त्यांचे योगदान आहे. महायुतीसाठी मुंबईतील सर्वात कठीण मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपने निकम यांची निवड केल्याचे आज स्पष्ट झाले.
उत्तर -मध्य मुंबई मतदारसंघातून २०१९ मध्ये दिवंगत केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या १ लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. यंदा राजकारणात नवख्या असणार्या ॲड. निकम यांच्यासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचे आव्हान असणार आहे.