पुणे : शिबिरात केवळ 15 पुरुषांची नसबंदी | पुढारी

पुणे : शिबिरात केवळ 15 पुरुषांची नसबंदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 8 ते 31 मे या कालावधीत सात दवाखान्यांमध्ये मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. या 22 दिवसांच्या कालावधीत केवळ 15 जणांनीच शस्रक्रिया करून घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नपुंसकत्व येईल, पौरुषत्वावर परिणाम होईल, अशा भीतीने अजूनही पुरुषांकडून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे टाळले जात आहे. कुटुंब नियोजन ही महिलांचीच जबाबदारी आहे, अशा पुरुषी आविर्भावामुळे कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांवरच टाकण्यात येत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत नसबंदीबाबत मात्र पुरुष उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरात शहरात 6 हजार 288 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र, यामध्ये महिलांचे प्रमाण 97 टक्के, तर पुरुषांचे प्रमाण केवळ सव्वातीन टक्के आहे. सुशिक्षित व पुढारलेल्या शहरातील परिस्थिती धक्कादायक असून, नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित होत आहे. कुटुंबनियोजनासाठी शासनातर्फे दर वर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. यासाठी शासनातर्फे शस्त्रक्रिया करणार्‍यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील, तसेच दारिर्द्यरेषेखालील महिलांना शासनातर्फे 600 रुपये, तर इतर महिलांना 250 रुपये शस्त्रक्रियेसाठी अनुदान दिले जाते. तर, पुरुषांना 1 हजार 100 रुपये नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतात.

पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजनाला हातभार लावावा, यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. मात्र, अनेक भ्रामक समजुतींमुळे पुरुष याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
                     – डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

 

हे ही वाचा :

नाशिक : सैनिकी वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत

२ माजी महापौरांसह १५ माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार

Back to top button