१६० देशांत होणार रामोत्सव | पुढारी

१६० देशांत होणार रामोत्सव

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिरातील 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिकेसह जगातील 160 देशांमध्ये या सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

संबंधित बातम्या : 

अयोध्येतील सोहळ्यामुळे भारतासह जगभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम स्क्वेअर याठिकाणी अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कॅलिफोर्निया, शिकागो, वॉशिंग्टन येथे मोटारगाड्यांची रॅली काढण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअरमध्ये या सोहळ्याचे डिजिटल प्रसारण करण्यात आले होते. फ्रान्समधील आयफेल टॉवर या ऐतिहासिक स्थळावरही हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. फ्रान्समधील पॅरिस येथे 21 जानेवारी रोजी रामरथ यात्रा काढण्यात येणार आहे. कॅनडातील मंदिरात पूजा-अर्चा आणि दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रभू श्रीराम हे भक्तांच्या आस्थेचा विषय आहेत. हिंदूंसाठी ते आराध्य दैवत मानले जातात. अयोध्येतील राम मंदिराची प्रतीक्षा 500 वर्षांपासून सुरू होती. हे स्वप्न साकार होत असल्याने भारतासह जगभर कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

टाईम स्क्वेअरसह आयफेल टॉवरवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) दिलेल्या माहितीनुसार, जगातील 160 देशांत सोहळा साजरा करण्यात येणार आहे. अमेरिकेतील 300 ठिकाणी तर ब्रिटन (25), ऑस्ट्रेलिया (30), कॅनडा (30), मॉरिशस (100), आयर्लंड, फिजी, जर्मनी, इंडोनेशिया या देशातील 50 ठिकाणी थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फिजी या देशांसह इंडोनेशिया, सौदी अरेबिया आदी देशांतील प्रतिनिधींनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विदेशातील देशांमध्ये शोभायात्रा, पूजा-अर्चा, ‘हनुमान चालिसा’ पठण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button