Ayodhya Ram Mandir : अयोध्येने मागितले 900 कोटी रामभक्तांनी दिले 3200 कोटी | पुढारी

Ayodhya Ram Mandir : अयोध्येने मागितले 900 कोटी रामभक्तांनी दिले 3200 कोटी

अयोध्या, वृत्तसंस्था : मंदिरासाठी भक्त असे छप्पर फाड के दान देतील, याची ट्रस्टलाही अपेक्षा नव्हती; पण घडले मात्र तसेच! भारतासह जगभरातील रामभक्तांकडून देणग्यांचा इतका वर्षाव झाला की, जमलेल्या पैशांच्या नुसत्या व्याजावरच रामलल्लाचा पहिला मजला पूर्ण झाला. मंदिराचा एकूण खर्च जितका आहे, त्यापेक्षा चार पटीने पैसा ट्रस्टला देणगी म्हणून मिळाला आहे.

कबिराचा एक दोहा आहे,‘ राम नाम की लूट है, लूट सके तो लूट; अंत समय पछतायेगा, जब प्राण जायेंगे छूट…’ नुसते हाय पैसा, हाय पैसा करू नका, रामनामाची कुठे उधळण होत असेल तर तुम्हीही त्यात सहभागी व्हा… रामनाम अंगिकारा व रामनामाचा जप करा, असे कबिरांना म्हणायचे आहे. अयोध्येतील रामलल्लासाठी भक्तांनी रामनाम तर अंगिकारलेच, पण दिल खोल के दाम (पैसा) उधळण्यात हात जराही आखडता घेतला नाही.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भारत आणि जगातील 11 कोटी लोकांकडून 900 कोटी रुपये जमविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते… तेही पूर्ण होते की नाही, अशी शंका ट्रस्टला होती; पण रामभक्तांमध्ये देण्याची जणू चढाओढ लागली आणि बघता-बघता उद्दिष्टाच्या चारपट रक्कम ट्रस्टकडे जमली. 3200 कोटी रुपये राम समर्पण निधीत गोळा झाले. त्याच्या व्याजातच मंदिराचा पहिला मजला तयार झाला. मुद्दल तशीच आहे! अर्थात, ट्रस्टला खूप काही करायचे आहे आणि प्राणप्रतिष्ठेनंतर देणग्यांचा ओघ आणखी वाढेल, अशी अपेक्षाही ट्रस्टला आहे.

ट्रस्टच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले की, मंदिराच्या कामासह विश्रामगृह, रुग्णालय, भोजनगृह, गोशाळा असे बरेच काही बाकी आहे. देणगीतील पै-पैचा हिशेब ठेवला जात आहे. वार्षिक लेखापरीक्षणही नियमितपणे होत आहे.

जलाभिषेकासाठी 1000 छिद्रे असलेले जर्मन चांदीचे भांडे

रामलल्लाच्या जलाभिषेकासाठी 1000 छिद्रे असलेले जर्मन चांदीचे भांडे तयार झालेले आहे. पूजेचे बहुतांश साहित्य काशीमध्ये तयार होत आहे. कांची शंकराचार्यांच्या पीठातूनही काही साहित्य अयोध्येत येणार आहे. मंदिराच्या आवारातच ईशान्य कोपर्‍यामध्ये हवनासाठी एक विशेष मंडप तयार करण्यात आला असून, त्यामध्ये दोन फूट खोली आणि रुंदीची 9 कुंडे तयार करण्यात येत आहेत. हवनात तूप आणि समिधा अर्पण करण्यासाठी तलावांमध्ये आंब्याच्या लाकडापासून मोठे चमचे तयार करण्यात येत आहेत.

गुगलची मदत घेणार प्रशासन

लखनौ पोलिस आयुक्तांनी वाहतूक पोलिस विभाग तसेच हायवे प्राधिकरण अधिकार्‍यांची गुरुवारी बैठक घेतली. अयोध्येसाठी जाणार्‍या वाहनांना रस्त्यांचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत त्यात चर्चा झाली. कमता ते चिनहट मटियारी, बाराबंकी येथून असलेल्या एकमेव मार्गासाठीही दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा व निर्णय झाला. पर्यायी मार्गांची माहिती वाहनचालकांना व्हावी म्हणून गुगलच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून हे रस्ते गुगल मॅपला जोडण्याचेही ठरले. पर्यायी मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याचाही निर्णय झाला.

वेलची प्रसादाची 5 लाख पाकिटे, 2 लाख लाडूही

भाविकांना वेलचीच्या दाण्यांचा प्रसाद मिळेल. ट्रस्टने 5 लाख पाकिटांची ऑर्डर दिली आहे. महाप्रसादासाठी मेहंदीपूर बालाजी येथून 2 लाख लाडूची पाकिटे येणार आहेत.

16 ते 22 जानेवारी ही अनुष्ठाने

16 जानेवारी : कलश यात्रा, पंचांग पूजनाने प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाचा श्रीगणेशा
17 जानेवारी : प्रायश्चित्त पूजन व अन्य अनुष्ठाने
18 जानेवारी : जन्मभूमीतील रामलल्लाच्या प्रवेशानंतर 108 कलशांनी अभिषेक
19 ते 21 जानेवारी : जलाधिवास, पुष्पाधिवास, फलाधिवास विधींसह हवन-पूजन
22 जानेवारी : प्राणप्रतिष्ठा. शूभमुहूर्तावर 12 वाजून 29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेत्रोन्मिलन विधीनंतर रामलल्लाला दर्पण दर्शन करवतील. महाआरती करतील.

22 जानेवारीचे नियोजन

सकाळी 11.30 : पाहुण्यांच्या आगमनाची वेळ
सकाळी 11.30 ते 12.30 : गर्भगृहात पूजा व प्राणप्रतिष्ठा
दुपारी 12.30 : पाहुण्यांची भाषणे व तद्नंतर श्रीराम दर्शन

मूर्ती घडवताना सतत सुरू होता नामजप

रामलल्लाच्या (बालस्वरूप) 3 मूर्ती अनुक्रमे गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे आणि अरुण योगीराज या 3 शिल्पकारांनी घडविल्या. ते शिळांना आकार देत असताना सतत मंत्रोच्चारण सुरू होते, अशी माहिती आता समोर आली आहे. तिन्ही शिल्पकारांच्या कार्यशाळेत वेदपंडित रोज सकाळ-संध्याकाळ मंत्रपठण करत असत. शिल्पकारांनी अखंड नामजपाची स्वतःची व्यवस्थाही निर्माण केली होती. या शिल्पकारांनी अयोध्येत 6 महिन्यांहून अधिक काळ काम केले.

सोहळ्यात 8 हजार लोकांची बैठक व्यवस्था

सोहळ्यात देशभरातील 8 हजार व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहुण्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी पाहुण्यांना त्यांच्या जागेवर पोहोचण्यात मदत करतील.

Back to top button