

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत २२ जानेवारीला श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ होत आहे, त्यानिमित्ताने देशात ऐक्य आणि सर्वसमावेशकता नांदावी यासाठी या सोहळ्यात मुस्लिमांसह इतर धर्माच्या लोकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे. ही बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र Organiser मध्ये प्रसिद्ध झाली आहे. (Ayodhya)
Ram Mandir, Rashtra Mandir – A Common Heritage या पुस्तकाच्या प्रकाशान समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लिम शाखा असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचचे इंद्रेश कुमार प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला मोठे महत्त्व आलेले आहे.
२२ जानेवारीला मशिदी, दर्गा आणि मद्रसामध्ये 'श्री राम, जय राम, जय जय राम' या मंत्राचे उच्चारण करावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे. देशातील ९९ टक्के मुस्लिम आणि इतर धर्मीय हे भारतीयच आहेत, त्यांनी जरी धर्म बदलला असला तरी त्यांची सांस्कृतिक आणि पिढीजात मुळं ही भारतीय आहेत, आणि ती या देशाला बांधून ठेवतात, असे ते म्हणाले. (Ayodhya)
ते म्हणाले, "आपले पूर्वज एकच होते. आपला चेहरा, आपली ओळखही एकच आहे. आपण याच देशाचे आहोत आणि परदेशी लोकांशी आपला काही संबंध नाही." प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुस्लिम, ख्रिश्चन, शिख अशा सर्वच धर्मियांनी त्यांच्या प्रार्थनास्थळी शांतता आणि बंधुत्व यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले. "मुस्लिम राष्ट्रीय मंचने मशिदी, दर्गा आणि मद्रशांतून ११ वेळा 'श्री राम जय राम जय जय राम' हा मंत्र म्हणावा असे आवाहन केले आहे. त्यानंतर आपल्या प्रार्थना म्हणाव्यात," असे ते म्हणाले. तसेच २२ जानेवारीला सर्व प्रार्थनास्थळांवर आकर्षक रोषणाई करावी, आणि सायंकाळी दिवा लावावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुला यांनी श्री राम फक्त हिंदूंचे नाही तर ते साऱ्या जगाचे आहेत, असे वक्तव्य केले होते, त्याच्याशी इंद्रेश कुमार यांनी सहमती दर्शवली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान उपस्थित होते.
हेही वाचा