हैदराबादच्या विजयाने मुंबईचे ‘पॅकअप’; हैदराबादचा लखनौवर एकतर्फी विजय | पुढारी

हैदराबादच्या विजयाने मुंबईचे ‘पॅकअप’; हैदराबादचा लखनौवर एकतर्फी विजय

हैदराबाद; वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबादने येथील आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपरजायंटसचा 10 गडी व 62 चेंडूंचा खेळ बाकी राखत एकतर्फी धुव्वा उडवल्यानंतर यामुळे मुंबई इंडियन्सचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. अशा रितीने मुंबई इंडियन्स हा यंदाच्या हंगामातून बाहेर फेकला जाणारा पहिला संघ देखील ठरला आहे.

लखनौ सुपरजायंटसने येथे 20 षटकात 4 बाद 165 धावा जमवल्यानंतर प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने केवळ 9.4 षटकातच एकही गडी न गमावत विजयाचे लक्ष्य पार केले आणि यामुळे मुंबईचा संघ या हंगामातून बाहेर फेकला गेल्याचे स्पष्ट झाले. विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य असताना सनरायझर्स हैदराबादतर्फे ट्रॅव्हिस हेडने अक्षरश: चौफेर फटकेबाजी करताना अवघ्या 30 चेंडूत 8 चौकार, 8 षटकारांसह 89 धावा फटकावल्या तर सहकारी सलामीवीर अभिषेक शर्मानेही त्याला तोडीस तोड साथ देताना 28 चेंडूत 75 धावांची रास ओतली. या उभयतांनी लखनौच्या गोलंदाजांचा अक्षरश: फडशा पाडल्याने हैदराबादने 9.4 षटकातच विजयाचे लक्ष्य एकही गडी न गमावता पार केले.

ट्रॅव्हिस हेड व अभिषेकच्या स्फोटक फलंदाजीने लखनौच्या प्रत्येक गोलंदाजाचे पृथक्करण बिघडून टाकले. त्याच्या तडाख्यात सापडलेल्या कृष्णप्पा गौतम (2 षटकात 0-29), यश ठाकुर (2.4 षटकात 0-47), बिश्नोई (2 षटकात 0-34), नवीन हक (2 षटकात 0-37), आयुष बदोनी (1 षटकात 0-19) या सर्वच गोलंदाजांची बरीच धुलाई झाली. कृष्णप्पा गौतमने 14.50 ची इकॉनॉमी नोंदवली आणि तीच लखनौसाठी सर्वात किफायतशीर इकॉनॉमी ठरली.

नव्या चेंडूवर भुवनेश्वर प्रभावी

प्रारंभी, लखनौला निर्धारित 20 षटकात 4 बाद 165 धावांपर्यंत मजल मारता आली. निकोलस पूरनने 26 चेंडूत 48 तर आयुष बदोनीने 30 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. भुवनेश्वरने 12 धावात 2 बळी घेत प्रभावी मारा साकारला.

टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या 10 षटकांमधील नवा विक्रम!

सनरायझर्स हैदराबादने अवघ्या 9.4 षटकात बिनबाद 166 धावांची लयलूट करत एकतर्फी विजय मिळवला, हा कोणत्याही टी20 क्रिकेट लढतीत पहिल्या 10 षटकांमधील नवा विक्रमही ठरला आहे. या एकतर्फी विजयासह हैदराबादचा संघ आता तिसर्या स्थानी झेपावला असून त्यांचे 12 सामन्यातून 14 गुण झाले आहेत.

ट्रॅव्हिसचे 16 चेंडूत तर अभिषेकचे 19 चेंडूत अर्धशतक!

धडाकेबाज, स्फोटक फलंदाजीवर भर देणार्या ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा या हैदराबादच्या सलामीवीरांनी लखनौच्या गोलंदाजीचा अक्षरश: धुव्वा उडवला. यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 16 चेंडूत तर अभिषेक शर्माने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक साजरे केले! त्यांच्या फटकेबाजीमुळे पॉवर प्ले आधीच हैदराबादचे शतक फलकावर लागले. पॉवर प्लेआधीच शतक साजरे केले जाण्याची ही या हंगामातील दुसरी वेळ ठरली आहे.

Back to top button