अमरावती : मोर्शीत संत्र्यावर मावा, पानावर ठिपके, प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन | पुढारी

अमरावती : मोर्शीत संत्र्यावर मावा, पानावर ठिपके, प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : तापमान वाढीच्या परिणामी जिल्ह्याच्या विविध भागात आंबिया बहरातील फळांची गळ तसेच संत्रा पाने पिवळी पडण्याच्या समस्येला शेतकरी तोंड देत आहेत. याची दखल घेत तज्ज्ञांच्या चमूने मोर्शी तालुक्यातील विविध संत्रा बागांची पाहणी करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मोर्शी तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणूनही या परिसराला ओळखले जाते. तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भीषण दुष्काळ, गारपीट, तापमान वाढ, अशा अनेक नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत आहे. अशावेळीच आता आणखीन एक मोठे संकट मोर्शी- वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर येऊन उभे ठाकले आहे. आंबिया बहार संत्रा गळती, शेंडे मर, कोळशी, व संत्रा झाडाची पाने पिवळी पडून गळत आहेत. सोबतच संत्राच्या झाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या रोगामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संशोधकांनी संत्रा बागांना भेटी देऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

त्यामध्ये संत्र्यावर मावा किडीचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. या रोगांवर सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Dimethoate 30EC @250 मिली + Dithane Z -78 (Zineb)200 gram kinva कार्बेन्डाझिम 50 WP @100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी आणि 15 दिवसानंतर Difenthiuron 50WP @200 ग्रॅम + Antracol @300 ग्रॅम किंवा Thiophanate methyl@ 200 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी म्हणजे मावा, सित्रस सिला, thrips, कोळी, लीफ मायनर आणि पानगळ भुरी रोगाचे आणि पानावरील ठिपके रोगाचे नियंत्रण होईल, असे मार्गदर्शन संशोधकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना केले.

यावेळी संशोधक डॉ. अनिल ठाकरे, डॉ. अतुल कळसकर, उप विभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी साजना इंगळे, मंडळ कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर, पांडुरंग म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी पर्यवेक्षक मोहन फुले, प्रमोद खर्चान, कृषी सहायक अंधारे, मनीष काळे, किशोर राऊत, संत्रा उत्पादक शेतकरी विजय विघे, अतुल काकडे, यांच्यासह आदी संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

संत्र्यावरील संशोधन संस्थेला उतरती कळा

संत्र्यावरील संशोधन होऊन फळाची गुणवत्ता वाढीस लागावी. म्हणून उभारण्यात आलेल्या देशातील एकमेव केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्थेला उतरती कळा लागली आहे. संशोधक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च प्रतीचा संत्रा उत्पादन करण्यास उत्पादकांना प्रोत्साहित करावे लागेल. मात्र त्यासाठी केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्थेकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कुठलेही नियोजन नसल्यामुळे विदर्भाच्या कॅलिफोर्नियातून संत्रा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.

           हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button