'खबरदार.. आमच्या जमिनीचा सर्व्हे कराल तर'.. शेतकरी आक्रमक | पुढारी

'खबरदार.. आमच्या जमिनीचा सर्व्हे कराल तर'.. शेतकरी आक्रमक

गर्लगुंजी; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासंदर्भात गर्लगुंजी व नंदीहळ्ळी भागातील शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रविवारी सर्व्हे करण्यासाठी कर्मचारी गर्लगुंजी परिसरात दाखल झाले होते. त्यांना शेतकर्‍यांनी माघारी धाडले. परवानगीशिवाय जमिनीत पाय ठेवाल तर याद राखा, असा सज्जड इशारा दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी तेथून काढता पाय घेतला. शेतकर्‍यांचा विरोध असतानाही बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी सुपीक जमीन घेतली जात असल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी दोनच दिवसांपूर्वी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. हा रेल्वे मार्ग देसूर ते केके कोप्पपर्यंत सुपीक जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा याला विरोध आहे. शेतकर्‍यांनी केआयडीबी धारवाड तसेच नैऋत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांकडे आक्षेपही नोंदविला आहेत. त्याचबरोबर धारवाड उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. असे असतानाही आरएसपीएस प्रा. लि. कंपनीचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी रविवारी गर्लगुजी शिवारात दाखल झाले.

यावेळी शेतकर्‍यांनी सर्व्हेला विरोध केला. ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यानी कर्मचार्‍यांना इशारा देताच अधिकार्‍याने माघारी जाणे पसंत केले. यावेळी पीकेपीएस नदीहळ्ळीचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ. किरण लोंढे, यशवंत पाटील, नामदेव कुंभार, अरुण सावंत, प्रकाश सिहानी, संजय सिद्दानी, कल्लाप्पा लोहार, संगामा कुमार, सदानंद पाटील, नामदेव कुमार मारुती राऊत, परशराम जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button