नागपुरात १० लाखांवर मतदार मतदानापासून दूर का? लक्षवेधी बॅनर | पुढारी

नागपुरात १० लाखांवर मतदार मतदानापासून दूर का? लक्षवेधी बॅनर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातील पाच मतदार संघांमध्ये शुक्रवारी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले. राज्याची उपराजधानी नागपूर लोकसभा मतदारसंघात 54.30 टक्के तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 61 टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी आता जाहीर झाली आहे. रामटेकला मतदान 3 टक्के वाढले असताना नागपुरातील कमी मतांचा टक्का कुणाला धक्का देणार, यावर आता पोल मॅनेजर्स, राजकीय विश्लेषकांची गणिते सुरू असताना आज नागपुरातील धरमपेठ ट्राफिक पार्क परिसरात एक बॅनर लक्षवेधी ठरले.

विशेष म्हणजे याच भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान आहे. नागपुरात 10 लाख 15 हजार 937 मतदार मतदानापासून दूर राहिले ही निश्चितच शरमेची बाजू असल्याकडे यातून लक्ष वेधण्यात आले आहे. अर्थातच हे बॅनर कुणी लावले याचा उल्लेख नाही. मतदान करणारे मतदारांच्या नावाने लावलेले हे बेनामी पण परिणामकारक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होताच मग महापालिका पथकाने ते काढून टाकले. नागपुरात भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे अशी थेट लढत देशात चर्चेत आहे. मतदानाचा टक्का 75 टक्के पर्यंत नेण्यात राजकीय पक्षांचे समर्थक आणि प्रशासनही कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपयशी ठरल्याने नेमका फायदा कुठे, कुणाला ? याविषयीची अनिश्चितता आहे.

हेही वाचा 

Back to top button