भंडारा : माकडाला ठार मारुन उलटे लटकविले, आरोपीविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

भंडारा : माकडाला ठार मारुन उलटे लटकविले, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : माकड घरात शिरल्याने वृद्धाचा राग अनावर झाला. रागाच्या भरात माकडाला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत माकडाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरी बाजीराव काटेखाये (वय ७५ रा. पालांदूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही संतापजनक घटना लाखनी तालुक्यातील गांधी चौकात मंगळवारी घडली.

ग्रामीण भागात सर्वत्र माकडांचा हैदोस सुरू आहे. माकडांमुळे घरांचे, शेत पिकांचे व परसबागेचे नुकसान होत आहे. वन विभागाकडे सुद्धा माकडांच्या नियंत्रणाकरिता कोणताही ठोस उपाय नाही. मात्र अशातच एखाद्याच्या घरात माकड शिरताच त्याचा राग अनावर होणे, काठीने बेदम प्राण जाईपर्यंत मारणे, निश्चितच घृणास्पद आहे. नुसता मारून थांबला नाही तर त्याला उलटे लटकवित त्याचे प्रदर्शन करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांना पाचारण केले. मृत माकडाचे शवविच्छेदन करून किटाडी येथे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी घटनास्थळी अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक श्यामकुवर, वनरक्षक नितीन पारधी, कुंभरे, गायकवाड, गायधने, बडोले उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button