Crime News : मुले चोरणार्‍या टोळीचा अखेर पर्दाफाश! | पुढारी

Crime News : मुले चोरणार्‍या टोळीचा अखेर पर्दाफाश!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून दोन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करून तीन लाखांना विकणार्‍या आणि त्याला विकत घेणार्‍या टोळीचा पर्दाफाश करीत बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातून एकाला बेड्या ठोकल्या. अपहरण करण्यात आलेल्या बालकाची विक्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावातील एकास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्त समोर आला आहे. पोलिसांनी शिताफीने बालकाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखर मालकाप्पा नडुगंड्डी (वय 24, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुतप्पा कांबळे (वय 55, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर आणि साथीदारांनी अपहरण केलेल्या बालकाची 3 लाख रुपयांमध्ये सुभाष कांबळे याला विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. कांबळेच्या ताब्यातून बालक ताब्यात घेण्यात आले.

वारसा चालविण्यासाठी विकत घेतले बाळ

अपघातात कुटुंबीय गमावल्याने वारसा पुढे चालविण्यासाठी बाळ विकत घेतल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात बाळाला विकत घेणार्‍या सुभाष कांबळेच्या कुटुंबातील बायको, मुलगा आणि सुनेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्याने मूल दत्तक घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार ओळखीच्या काही तरुणांना त्याने अनाथाश्रमातील मूल कुठे मिळू शकेल का? अशी विचारणा केली होती. संबंधित आरोपींनी सुभाष कांबळे याला सांगितले की, ज्यांना मुले नको असतात ते विक्री करतात. तुम्हास मूल मिळवून देतो, असे सांगत तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. यानंतर सुभाष कांबळे याने आरोपींना काही रक्कम आगाऊ दिली. त्यानंतर कार घेऊन आरोपी पुण्यात आले. पुणे रेल्वे स्टेशन येथून झोपलेल्या अवस्थेतील श्रावण यास अपहरण करून नेले.

अपहरणानंतर पोलिस लागले कामाला

बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तीन टीम केल्या. पुणे स्टेशन परिसरातील 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात सहा महिन्यांच्या श्रावणचे अपहरण करणारी एक व्यक्ती अस्पष्टपणे दिसून आली. यानंतर अधिक तपासात संशयित इसम पुणे रेल्वे स्टेशनपासून पुढे कोणत्या मार्गाने गेला, हे दिसून येत नव्हते. तसेच या गुन्ह्यात कारचा वापर आणि एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची संशय आला होता. यानंतर तांत्रिक विश्लेषणात या गुन्ह्यातील आरोपी हे चारचाकी गाडीतून पुणे स्टेशनवरून विजापूर कर्नाटक येथे गेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी विजापूर येथे सापळा रचून चंद्रशेखर नडुगंड्डी याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत 4 साथीदारांच्या मदतीने पुणे स्थानकातून अपहरण केल्याचे सांगितले. बालकाची विक्री 3 लाख रुपयांना सुभाष कांबळे याला केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी विजापूर येथील वेगवेगळ्या हॉटेलची पाहणी केल्यानंतर एका हॉटेलमध्ये अपहरण झालेले बालक आणि आरोपी सुभाष कांबळे आढळून आले.

असे झाले अपहरण

पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 27) घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. श्रावण अजय तेलंग असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अजय तेलंग याची आई येरवडा कारागृहात आहे. तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे. आईला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा 6 महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. तेलंग दाम्पत्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. त्यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिस पथकाला लाखाचे बक्षीस

बालकाचा शोध घेणार्‍या बंडगार्डन पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षीस देऊन पथकाचा गौरव केला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाले, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे, पोलिस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू धुलगुडे, विलास केकान यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Back to top button