भंडारा : पत्नीला टोमणा मारला; मुलाने वडिलांचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला | पुढारी

भंडारा : पत्नीला टोमणा मारला; मुलाने वडिलांचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : सूनेला कामावरून टोचून बोलणाऱ्या वडिलांचा संतापलेल्या मुलाने कुऱ्हाडीने वार करुन खून केला. ही घटना साकोली तालुक्यातील सोनमाळा येथे शुक्रवारी रात्री घडली. जानबा गोगलू मेश्राम (वय ७०) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. तर देवेंद्र जानबा मेश्राम (वय ३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, देवेंद्र हा पत्नी आणि तीन मुलांसह जानबा यांच्या घरीच वेगळ्या खोलीत राहत होता. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जानबा मेश्राम बाहेरुन घरी आले. तेव्हा त्यांचा नातू अनिकेत हा त्यांच्याजवळ गेला. तेव्हा जानबा यांनी नातूला ‘तुझी आई सडासारवन करीत नाही, झाडू करत नाही, तुम्ही अलग निघा, किरायाने रहा’, असे बोलले.

वडिलांचे म्हणणे देवेंद्रने ऐकले.  तो आपल्या खोलीतून बाहेर आला. त्‍याने वडिलांना शिवीगाळ केली. कुऱ्हाडीने जानबा यांच्या मानेवर, छातीवर जोरदार वार केले. जानबा यांच्या पत्नीने चादरीने त्यांच्या मानेतील रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. काही वेळातच जानबा यांचा मृत्‍यू झाला.  देवेंद्र याच्या बहिणीने त्याला हटकले असता देवेंद्रने तिचेही केस पकडून तिला मारहाण केली.

घटनेची माहिती साकोली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी देवेंद्रविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ आणि ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.  तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खोकले करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button