पुढारी ऑनलाईन डेस्क :
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्याला जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी याअगोदरही ही मासिक पाळी सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. यातून स्त्रीबीज फलित होत मात्र गर्भनिर्मिती नाही झाल्यास, ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे महिलेच्या आरोग्यासाठी योनी या अवयवाची स्वच्छता महत्त्वाची आहे.
मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छतेचे पालन न केल्यास महिलांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. "मासिक पाळी ही एक प्रजननासाठी आवश्यक प्रक्रिया आहे. मासिक पाळी दरम्यान आवश्यक काळजी न घेतल्यास, ऍलर्जी आणि योनीमार्गातील संसर्ग होऊ शकतो. याचा परिणाम हा प्रजनन क्षमता आणि संबंधित महिलेच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे यादरम्यान स्वच्छता महत्त्वाची आहे.
मासिक पाळी दरम्यान पॅड, कप जास्त वेळ घातल्याने फंगल इन्फेक्शन होऊ शकते. ओलसर पॅड जास्तवेळ ठेवल्याने जीवाणूंची निर्मिती होऊन मूत्रमार्गात, योनीमार्गात इंन्फेक्शन होऊ शकते. या अवयवाच्या भागातील त्वचेवर पुरळ येण्याची शक्यताही यादरम्यान जास्त असते. पॅडमुळे संवेदनशील त्वचेलाही त्रास होऊ शकतो, त्यामुळे मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त आराम करावा.
टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा आजार महिलांच्या शरीरासाठी धोकादायक ठरत आहे. स्टॅफिलोकोकस ऑरियस या बॅक्टेरियांची वाढ जास्त प्रमाणात झाल्यामुळे हा आजार वाढत जातो. साधारणपणे पिरिएड्सदरम्यान टॅम्पॉन जास्त काळ घातला गेला तर जीवाणूंच्या संसर्ग वाढून टॉक्सिक शॉक सिंड्रोम होऊ शकतो.
बॅक्टेरियल योनिओसिस हा प्रसूती वयाच्या स्त्रियांना प्रभावित करते. योनिमार्गात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या जीवाणूंच्या अतिवृद्धीमुळे होणारा योनिमार्गाचा दाह आहे. जो योनीचे नैसर्गिक संतुलन बिघडवतो. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्या अभावामुळे ही चिंताजनक स्थिती उद्भवू शकते.
पुनरुत्पादक मार्गाचे संक्रमण हे जननेंद्रियाचे संक्रमण आहे. ते मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्या अभावामुळे उद्भवू शकतात आणि यामुळे मोठ्या आरोग्य समस्या उपस्थित होऊ शकतात.