Arvind Kejriwal : लोकसभा २०२४ ची निवडणूक जिंकणं आमचं लक्ष्य नाही | पुढारी

Arvind Kejriwal : लोकसभा २०२४ ची निवडणूक जिंकणं आमचं लक्ष्य नाही

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकणे, हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही, तर सर्वप्रथम भारत देश आमचं लक्ष्य आहे. भारताला जगात क्रमांक एकचा देश झालेला बघायचं आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज  येथे केले. एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता ते बोलत होते.

यावेळी केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, आम्ही आमचे करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही. करिअर सोडून राजकारणात आलो आहोत. भारत मातेसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर देशाला वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. कुणालाही आम्हाला हरवायचे नाही. तर देशाला आम्हाला जिंकवायचे आहे. त्याकरीता १३० कोटी जनतेची आघाडी करायची आहे, असे सूचक विधानही त्‍यांनी यावेळी केले.

आम्हाला चोरी आणि भ्रष्टाचार करायला येत नाही, गुंडगिरी करता येत नाही, तसेच दंगली घडवता येत नाही; पण शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात. जर तुम्हाला दंगली हव्या असतील, तर त्यांच्या सोबत जा, जर शाळा आणि हॉस्पिटल्स हवे असतील, तर आमच्यासोबत या,  असे आवाहनही त्‍यांनी केले.

मी देवाकडे दोन गोष्टी मागतो. एक म्हणजे भारत नेहमी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश राहो. दुसरं म्हणजे जोपर्यंत भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनत नाही, तोपर्यंत मला मृत्यू मिळू नये.  महाराष्ट्रात सरकारी शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. सुरुवातीला दिल्लीमध्ये शाळांची हीच स्थिती होती, आता ही स्थिती बदलली आहे. सरकारी शाळांतील बारावीतील निकाल हा ९७ टक्के इतका आहे. सुमारे ४ लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये दाखल झाले आहेत, अशी माहितीही त्‍यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button