महिला अन्नसुरक्षा अधिकार्‍याच्या घरी 80 तोळे सोने, रोकड, हिर्‍याचा हार जप्त | पुढारी

महिला अन्नसुरक्षा अधिकार्‍याच्या घरी 80 तोळे सोने, रोकड, हिर्‍याचा हार जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हॉटेलवरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करून 25 हजारांची रक्कम घेताना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती धनाजी देशमुख (वय 32, सध्या रा. ताराबाई पार्क, मूळ गाव मोहोळ, जि. सोलापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी अटक केली. दरम्यान, देशमुख यांच्या घरावरील छाप्यात 80 तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन लाख रुपयांची रोकड आणि साडेतीन लाख रुपये किमतीचा हिर्‍याचा हार जप्त करण्यात आला.

अन्नसुरक्षा अधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडल्याने अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देशमुख यांच्या घरावर पथकाने तत्काळ छापेमारी करून झडती घेतली. त्यात मोठे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. संशयित कीर्ती देशमुख यांच्या मोहोळ या मूळ

गावासह पुण्यातील नातेवाईकांच्या घराचीही झडती घेण्यात येत आहे, असे लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी पत्रकारांना सांगितले. देशमुख यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार व्यावसायिकाचे किणी (ता. हातकणंगले) येथे सम—ाट फूडस नावाचे रेस्टॉरंट आहे. अन्नसुरक्षा अधिकारी देशमुख यांनी 15 मार्च रोजी संबंधित रेस्टॉरंटची तपासणी केली. रेस्टॉरंटमधून त्यांनी अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.

त्यानंतर व्यावसायिकाशी संपर्क साधून संबंधित रेस्टॉरंटसह मालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी एक लाखांची मागणी केली. व्यावसायिकाने मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यावर 70 हजारांवर तडजोड झाली. 70 हजाराच्या रकमेपोटी पहिल्या टप्प्यात देशमुख यांनी 25 हजारांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्याशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली.

पार्किंगमध्येच कारवाई

देशमुख यांनी लाचेची रक्कम घेऊन व्यावसायिकाला आपल्या राहण्याच्या ठिकाणी ताराबाई पार्क येथील विश्व रेसिडेन्सीमधील पार्किंग येथे येण्यास सांगितले. शुक्रवारी दुपारी बारा वाजता व्यावसायिकाकडून लाच स्वरूपात 25 हजारांची रक्कम स्वीकारत असताना पथकाने देशमुख यांना रंगेहाथ पकडले. यावेळी 17 लाख रु. किमतीची आलिशान मोटारही हस्तगत करण्यात आल्याचे उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले. कारवाईत उपअधीक्षक सरदार नाळे यांच्यासह पथकातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

वरिष्ठांचे धाबे दणाणले; क्षणार्धात सन्नाटा

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकार्‍याला लाचप्रकरणी अटक झाल्याची माहिती शहर, जिल्ह्यात वार्‍यासारखी पसरताच वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले. काही वेळात अन्न व औषध प्रशासन कार्यालयात अक्षरश: सन्नाटा पसरला.

16 महिन्यांत जिल्ह्यातील 31 लाचखोर सापळ्यात!

जानेवारी ते डिसेंबर 2023 तसेच जानेवारी ते 26 एप्रिल 2024 या काळात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांतर्गत 31 सरकारी बाबू लाचखोरीच्या जाळ्यात सापडले आहेत. एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे व त्यांच्या पथकाने लाचखोरांना कारवाईद्वारे कोठडीत बंद केले आहे. शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध पथकाकडे संबंधितांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहनही नाळे यांनी केले आहे.

Back to top button