नागपुरात चार हजारावर वीजचोऱ्या उघड; 149 लोकांवर गुन्हे दाखल | पुढारी

नागपुरात चार हजारावर वीजचोऱ्या उघड; 149 लोकांवर गुन्हे दाखल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर महावितरण परिमंडळात 2023-24 वर्षामध्ये तब्बल 4 हजार 50 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. अवैध वीज चोरीची 2024 तर विद्युत मीटरमध्ये फेरफार तसेच आकडा टाकूण थेट वीजचोरीची 1692 प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व वीज चोरीचे मुल्य तब्बल 7 कोटी 26 लाख 44 हजार असून, 149 लोकांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर महावितरण परिमंडळांतर्गंत असलेल्या नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा मंडळात वीज चोरी विरोधात आक्रमक मोहीम राबविण्यात आली. दरम्यान नागपूर शहर मंडळात बेकायदेशीर वीज वापर, अतिरिक्त वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 263, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी 1331 तर वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 789 प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीची रक्कम तब्बल 4 कोटी 46 लाख 21 हजार इतकी आहे. यापैकी 1593 ग्राहकांवर तडजोडीपोटी 52 लाख 92 हजारांचा दंड आकारण्यात आला असून, 146 वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

नागपूर ग्रामीण मंडळात बेकायदेशीर वीज वापर, अतिरिक्त वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 22, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 526 तर वीज मीटरमध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 371 प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल 1 कोटी 54 हजार इतकी आहे. यापैकी 607 ग्राहकांवर तडजोडीपोटी 14 लाख 83 हजारांचा दंड आकारण्यात आला. यासोबतच महावितरणने वर्धा जिल्ह्यात देखील वीजचोरीलसाठी 147 तर वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरी 532 प्रकरणे उघडकीस आणली. या वीजचोरीची रक्कम तब्बल 1 कोटी 79 लाख 68 हजार रुपये इतकी आहे. यापैकी 498 ग्राहकांवर तडजोडीपोटी 19 लाख 46 हजाराचा दंड आकारण्यात आला.

Back to top button