कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात तपोवन मैदानावर शनिवारी सायंकाळी 5 वा. महाविजय संकल्प सभा होणार आहे. सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांची पहिलीच सभा होत असल्याने प्रचंड उत्सुकता आहे. सभेसाठी सुमारे दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या (एस.पी.जी.) अधिकार्यांनी सभेचे ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर ताब्यात घेतला आहे. एसपीजीच्या अधिकार्यांनी पाहणी करून जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस आणि महापालिका अधिकार्यांना सूचना दिल्या. सभेसाठी दीड हजारावर पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारपासूनच शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीमधील पक्षांच्या वतीने सभेचे नियोजन केले जात आहे. पंतप्रधान मोदी सभेला जाणारे रस्ते स्वागताचे होर्डिंग आणि फलक लावून सजवले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. सभेच्या तयारीसाठी पालकमंत्री मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक यांच्यासह तीनही पक्षाच्या पदाधिकार्यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.
नऊ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी कोल्हापुरात
नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्री असताना तर दोनवेळा पंतप्रधान असताना कोल्हापूरचा दौरा केला आहे. 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर 2009 मध्ये मुख्यमंत्री असताना आणि 2014 मध्ये पंतप्रधान असताना विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ते आले होते. त्यानंतर 3 जानेवारी 2015 रोजी दै. 'पुढारी'च्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले होते. आता तब्बल 9 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी कोल्हापुरात येत आहेत.