सोलापूर: सदाशिवनगर येथील जिल्हा बँक फोडली; ५१ लाखांसह दागिने लंपास | पुढारी

सोलापूर: सदाशिवनगर येथील जिल्हा बँक फोडली; ५१ लाखांसह दागिने लंपास

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा: सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा अज्ञात चोरट्याने फोडली. बँकेतील ५१ लाख रोख व ग्राहकांच्या पाच लॉकर मधील सोन्याचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत जिल्हा बँकेचे शाखाधिकारी भारत नामदेव लोढे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिवनगर येथे सोलापूर जिल्हा बँकेची शाखा आहे. या शाखेचा पाठीमागील दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. ऑक्सिजन गॅस कटरचा वापर करून लोखंडी दरवाजे कापले. त्यानंतर स्ट्राँग रूममध्ये प्रवेश करून लोखंडी कपाट उचकटून 51 लाख 16 हजार 477 रुपयांची रक्कम लंपास केली. त्याचबरोबर 75 लॉकर पैकी सहा लॉकर तोडून ग्राहकांचे सोने लंपास केले.

या सहा लॉकरमध्ये दीपक हिराचंद दीक्षित, जगन्नाथ प्रभाकर रणनवरे, नारायण ज्ञानेश्वर सालगुडे, सुनिता कुंडलिक पालवे, नूर मोहम्मद तांबोळी व संजय सूळ यांचे दागिने होते. तर 73 नंबरचा प्रशांत दोशी यांचा लॉकर गॅस कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी शाखेत प्रवेश केल्यानंतर वीजपुरवठा बंदकरुन सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या.

माळशिरस पोलिसांनी सोलापूरहून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वान पथकाने बँकेकडून नातेपुते कडे जाणाऱ्या रोडवर दोन किलोमीटर पर्यंत मग काढला. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपाधीक्षक हिम्मतराव जाधव, अकलूज येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सई पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button