राजस्थान-मध्य प्रदेशसह १७ राज्यात २ दिवसांनी हवामान बदलणार | पुढारी

राजस्थान-मध्य प्रदेशसह १७ राज्यात २ दिवसांनी हवामान बदलणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजस्थान-मध्य प्रदेशसह १७ राज्यात २ दिवसांनी हवामान बदलण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या देशात सुरू असलेले उष्णतेची लाट कमी होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मुंबई-तामिळनाडूच्या समुद्रात ५ फूट उंच लाटा उसळू शकतात. असा इशाराही शनिवारी (दि.४) हवामान खात्याने दिला.

देशातील तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या शहरांना येत्या ८ दिवसांत दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. दि. ४ मे पासून आणखी एक पश्चिमी वादळ सक्रिय होत आहे. त्यामुळे देशाच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होईल, तर सपाट भागात हवामान बदलून पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पुढील दोन दिवसात ईशान्येतील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आसाम आणि मेघालयमध्ये २०४.४ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या उत्तर भारताव्यतिरिक्त दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकातही उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पाऱ्याने ४५ अंशचा टप्पा ओलांडला आहे. ३ मे रोजी देशातील सर्वाधिक तापमान आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे होते. जेथे ४६.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. यानंतर तेलंगणातील खम्मम, बंगालमधील कलाईकुंडा, ओडिशातील बुद्ध आणि तामिळनाडूमधील इरोड येथे पारा ४२ अंश ते ४५ अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आला.

मुंबई आणि आसपासच्या किनारी भागात सागरी लाटांचा हवामान खात्याचा इशारा हवामान खात्याने शनिवार (४ मे) पासून पुढील 36 तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या किनारी भागात सागरी लाटांचा इशारा जारी केला आहे. या काळात समुद्रात ५ फूट उंचीपर्यंतच्या लाटा उसळू शकतात. तसेच तामिळनाडूसाठीही हा इशारा देण्यात आला.

Back to top button