आरसीबीला ‘काडीचा आधार’ | पुढारी

आरसीबीला ‘काडीचा आधार’

बंगळूर, वृत्तसंस्था : आयपीएल 2024 सुरू झाल्यापासून बहुतांश काळ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने अचानकउसळी घेतली. शनिवारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सवर 4 विकेटस् आणि 38 चेंडू शिल्लक राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत सातव्या स्थानावर भरारी घेतली.

गुजरात टायटन्सविरुद्ध आरसीबीने उत्तम सांघिक कामगिरी करून दाखवली. मोहम्मद सिराज, यश दयाल यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. विराट कोहलीने एक भन्नाट रनआऊट करून सामन्याला खर्‍या अर्थाने कलाटणी दिली. विजयकुमार वैशाखने 20 व्या षटकात सलग 3 विकेटस मिळवून दिल्या आणि गुजरातला 147 धावांत रोखले.

गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. फाफ डू प्लेसिसने चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना 18 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. हे बेंगळुरूसाठीचे दुसर्‍या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले.

अर्धशतकानंतर फाफ डू प्लेसिसला जोशुआ लिटीलने 6 व्या षटकात बाद केले. डू प्लेसिसने 23 चेंडूंत 64 धावा केल्या. या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार त्याने मारले. त्यानंतर 7 व्या षटकात विल जॅक्सला नूर अहमदने अवघ्या 1 धावेवर बाद केले. डू प्लेसिस आणि विल जॅक्स या दोघांचाही झेल शाहरूख खानने घेतला.

बेंगळुरूने सुरुवात शानदार केली होती. परंतु, पॉवर प्लेच्या 6 षटकांनंतर गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. विल जॅक्सनंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनाही 8 व्या षटकात जोशुआ लिटिलने बाद केले. पाटीदार 2 धावांवर आणि मॅक्सवेल 4 धावांवर बाद झाला. या दोघांचेही झेल डेव्हिड मिलरने घेतले.

जोशुआ लिटीलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्याने 10 व्या षटकात कॅमेरून ग्रीनलाही 1 धावेवर माघारी धाडले. त्यामुळे बिनबाद 92 वरून बेंगळुरूची अवस्था 5 बाद 111 धावा अशी झाली. जोशुआ लिटीलचा स्पेल संपल्यानंतर विराट आणि दिनेश कार्तिक विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच विराटला नूर अहमदने बाद केले. विराट 27 चेंडूंत 42 धावा करून बाद झाला. त्यावेळी बेंगळुरूने 116 धावा केल्या होत्या. त्यामुळे अवघ्या बिनबाद 92 धावसंख्येनंतर अवघ्या 24 धावांत बेंगळुरूने 6 विकेटस् गमावल्या.

मधल्या षटकांमधील पडझडीनंतर दिनेश कार्तिकने स्वप्निल सिंगला साथीला घेत डाव सावरत बेंगळुरूला विजयापर्यंत पोहोचवले. बेंगळुरूने 147 धावांचे आव्हान 13.4 षटकांत 152 धावा करत पूर्ण केले. कार्तिक 12 चेंडूंत 21 धावांवर नाबाद राहिला, तर स्वप्निल 9 चेंडूंत 15 धावा करून नाबाद राहिला.

तत्पूर्वी, आरसीबीने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने दुसर्‍या षटकात वृद्धिमान साहा (1) याला बाद केले. सिराजने त्याच्या पुढच्या षटकात शुभमन गिल (2) यालाही तंबूत पाठवून गुजरातला मोठा धक्का दिला. कॅमेरून ग्रीनने त्याच्या पहिल्या षटकात साई सुदर्शनला (6) चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले आणि विराट कोहलीने सोपा झेल टिपला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरातने 23 धावांत 3 विकेटस् गमावल्या. यंदाच्या पर्वातील ही आयपीएलमधील सर्वात खराब कामगिरी ठरली. यापूर्वी पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3 बाद 27 धावा केल्या होत्या. डेव्हिड मिलर व शाहरूख खान यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि 10 षटकांत संघाला 61 धावांपर्यंत पोहोचवले. 11व्या षटकात मिलरचा झेल कर्ण शर्माने टाकला. पण, कर्ण शर्माने त्याच्या गोलंदाजीवर विकेट मिळवली. मिलर 20 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 30 धावांवर बाद झाला आणि त्याची शाहरूखसह 61 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

पुढच्या षटकात शाहरूख खान (37) रनआऊट झाला आणि गुजरातचा निम्मा संघ 87 धावांत तंबूत परतला. राशिद खान आणि राहुल तेवतिया यांनी गुजरातची गाडी पुन्हा रुळावर आणली. यश दयालने 29 चेंडूंत 44 धावांची ही भागीदारी तोडली आणि राशिद 18 धावांवर त्रिफळाचीत झाला. यशने त्याच षटकात तेवतियाला (35) बाद करून सामना पुन्हा फिरवला. गुजरातचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 147 धावांत तंबूत परतला.

ऑरेंज कॅप पुन्हा कोहलीकडे

विराट कोहलीने 10 वी धाव काढताना पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे. दोन दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाडने त्याच्यापेक्षा 9 जास्त धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. परंतु, आता पुन्हा एकदा विराट ऑरेंज कॅपचा मानकरी झाला आहे.

Back to top button