मुंबई-चेन्नई, कोणार्कसह विशाखापट्टणम एक्सप्रेस धावल्या पाच तास उशिरा; रेल्वेच्या दुर्लक्षामुळे वेळापत्रक कोलमडले | पुढारी

मुंबई-चेन्नई, कोणार्कसह विशाखापट्टणम एक्सप्रेस धावल्या पाच तास उशिरा; रेल्वेच्या दुर्लक्षामुळे वेळापत्रक कोलमडले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या दुर्लक्षामुळे मेल एक्सप्रेससह पॅसेंजर गाड्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यांच्या धावण्यातील विसंगतीमुळे प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. परिणामी मुंबई-चेन्नई या मार्गावरील विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम पूर्ण असून देखील मागील काही महिन्यांपासून एक्सप्रेससह सर्व पॅसेंजर गाड्या चार ते पाच तास विलंबाने धावत आहेत. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना तासानतास तटकळत बसावे लागत आहे. त्यासोबतच रेल्वे स्थानकावर विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, मुंबई-चेन्नई रेल्वे मार्ग देशातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरील विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वेला ‘अच्छे दिन’ येतील आणि सर्व सामान्य प्रवाश्यांना सर्व सोयीसुविधा बरोबर सुरक्षा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, सामन्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्याचे वेळापत्रक पूर्णता कोलमडले आहे. परिणामी, छोट्या रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वेच्या क्रॉसिंगच्या नावाखाली तासनतास रेल्वे थांबविली जात आहे.

शनिवार (दि.4) चार मे रोजी मुंबई-चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस पहाटे चार वाजता येणे अपेक्षित होते. मात्र, दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सोलापूर स्थानकावर दाखल झाल्याने जवळपास गाडी आठ तास उशिराने पोहोचली. तर, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मुंबईला 12 वाजून 35 मिनिटांनी पोचणे अपेक्षित होते. पण, ही गाडी एक वाजून 3 मिनिटांनी पोचल्याने जवळपास 25 मिनिटे उशिराने पोचली तर भुनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस गाडी सोलापूर स्थानकावर सायंकाळी 6 वाजता येणे अपेक्षित असताना रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी पोहोचल्याने ही गाडी 5 तास 30 मिनिटे उशिराने पोचली तर विशाखापट्टणम-मुंबई एक्सप्रेस ही गाडी सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सोलापूर स्थानकावर येणे अपेक्षित होते. परंतु, रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी आल्याने ही गाडी जवळपास चार तास उशिराने पोचली. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

लग्नसराई, देवदर्शन, पर्यटन आदी ठिकाणी जाणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा अनुभव शनिवारीच्या (दि.4 ) प्रवासा दरम्यान अनेक प्रवाश्यांना आला आहे. फलाट क्रमांक चार आणि पाच वर पंखे नसल्याने तळपत्या उन्हात अंगाची लाही-लाही, रेल्वे स्थानकावर कचऱ्याचे साम्राज्य आदीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. अगोदरच गरमीचे वातावरण आणि यात असा प्रकार याचा फटका लहान बालकासह, वयोवृद्ध नागरिकांना बसला आहे.

सोलापूर स्थानकावर उशिराने आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक       झालेला उशीर

22160                  8 तास
22226                25 मिनिटे
11020            5 तास 30 मिनिटे
18519                   4 तास
16351                   3 तास
18520                   1 तास
11017                   1 तास

Back to top button